प्रतिनिधी,आजरा
वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसान भरपाई तातडीने मिळावी. धनगर बांधवांना त्यांच्या हक्काच्या वनजमीनी मिळाव्या या प्रमुख मागण्यांसह आजरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी वनविभागाच्या सुलगांव येथील कार्यालयावर मोर्चा काढला. पिकांची शंभर टक्के नुकसान भरपाई द्या तसेच वनमंत्री तसेच वन विभागाच्या प्रधान सचिवांसोबत बैठक घेण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहापासून मोर्चा व्हिक्टोरीया पुलावरून सुलगांव फाटा मार्गे वनविभागाच्या कार्यालयावर धडकला. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, 1070-80 च्या दशकात वन्यप्राणी माणसांना दिसत नव्हते. पण आता हेच प्राणी घरापर्यंत पोहोचले असून याला वनविभाग जबाबदार आहे. जंगल उद्ध्वस्त करण्याचे काम वनविभागाने केल्याचा आरोप कॉ. देसाई यांनी केला. तुम्ही जंगल उद्ध्वस्त केली ती समृद्ध करण्याची जबाबदारीही तुमचीच असून त्याची सुरूवात आजरा तालुक्यातून व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली.
गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ आम्ही जंगल समृद्धी करण्याची मागणी करीत आहोत. पण याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहेत. तुम्ही लावलेल्या अॅकेशिया आणि निलगिरी या वृक्षांमुळे जंगलातील चारा नष्ट झाला. परिणामी वन्यप्राणी शेतामध्ये येऊ लागले. जंगलात लावण्यात आलेली ही परदेशी झाडे तोडून स्थानिक प्रजातीची झाडे लावा, अन्यथा आता आम्हालाच कुऱ्हाड हाती घ्यावी लागेल असा इशाराही कॉ. देसाई यांनी दिला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने 50 हजार रूपयांची मदत द्यावी. त्याचा पंचनामा व इतर प्रक्रिया नंतर पार पाडावी अशी मागणी करण्यात आली. याबरोबर केरळ राजाच्या धर्तीवर पिकांची शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी. पिढ्यान्पिढ्या जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांचे वनजमिनीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढून त्यांना हक्काची जमीन द्यावी आदी मागण्याही करण्यात आल्या.
यानंतर हरीबा कांबळे, निवृत्ती कांबळे, कॉ. शिवाजी गुरव, नारायण भडांगे, कॉ. संजय घाटगे, शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, यशवंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. वन्यप्राण्यांकडून पिकांची नुकसानी होत असल्याने आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न करण्यात आला. सध्या हत्ती, गव्यांबरोबरच मोर, लांडोर यांच्यासह वानरांचा मोठा उपद्रव सुरू झाला आहे. या सर्व प्राण्यांनी आता माणसाचं जगणं असह्या केले असून तुमची जनावरे तुमच्या ताब्यात ठेवा अशी सूचनाही यावेळी मनोगतातून अनेकांनी केली.
आमच्या मागणीनुसार राज्याचे वनमंत्री तसेच प्रधान सचिवांशी बैठकीचे ठोस आश्वासन देत नाही तोवर कार्यालयासमोर हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. परीक्षेत्र वनअधिकारी स्मिता डाके यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने पाठविले जात असून अनुदान उपलब्ध होताच नुकसान भरपाई दिली जात असल्याचे सांगितले. तर या प्रश्नांबाबत 2 ऑक्टोबर रोजी आजरा येथे मुख्य वनसंरक्षक रामनुजन व जिल्हा उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या मोर्चात बाबू येडगे, संजय शेणवी, ज्ञानदेव गुरव, प्रकाश मोरूस्कर, धनाजी सावंत, पांडूरंग कानडे, तुळसाप्पा पोवार यांच्यासह तालुक्याच्या विविध गावातून आलेले नुकसानग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.









