निपाणीत महामार्गावर लिंगपूजा : यापुढे राज्यव्यापी आंदोलन : बसवजय मृत्युंजय स्वामींचा इशारा
निपाणी : पंचमसाली लिंगायत समाजाला 2 ए आरक्षण देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आरक्षणासाठी सहाव्या टप्प्यातील आंदोलन समाजाने हाती घेतले आहे. त्यानुसार कुडलसंगम शक्तीपीठाचे श्री बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी निपाणीत लिंगायत समाजबांधवांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला. यावेळी महामार्गावर ईष्टलिंग पूजा करून सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील विविध जिह्यात आरक्षणासाठी आंदोलन छेडण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्य सरकारने आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रारंभी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता समाजबांधवांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे ध्वज घेऊन शहरातून दुचाकी रॅली काढली. तसेच महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्यांना स्वामीजींच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.









