जनतेनेही स्वच्छता राखण्याची गरज
बेळगाव : प्रभाग क्रमांक 12 मध्ये रस्त्याच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत होता. या कचऱ्यामुळे मोकाट जनावरे तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यामुळे तेथील ब्लॅकस्पॉट हटवावा, अशी मागणी करण्यात येत होती. शनिवारी पहाटेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन तेथील ब्लॅकस्पॉट हटविला व त्या ठिकाणी फलकाची उभरणी केली आहे. सुभाषनगर परिसरात असलेला हा ब्लॅकस्पॉट हटविण्याची मागणी वारंवार होत होती. मोठ्या प्रमाणात तेथे कचऱ्याचा ढीग पडत होता. त्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. महापालिकेच्यावतीने शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जवळपास 200 हून अधिक ब्लॅकस्पॉट हटविले आहेत. शहरामध्ये आता काही मोजकेच ब्लॅकस्पॉट असून तेही लवकरच हटविले जाणार आहेत. कचरामुक्त शहर करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शनिवारी सुभाषनगर येथील ‘तो’ ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला. यावेळी नगरसेवक शहीद पठाण, बाबाजान मतवाले आणि रियाज किल्लेदार, महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









