यावर्षी फोम, रबरी, डिजिटल मखर वेधून घेताहेत गणेशभक्तांचे लक्ष
बेळगाव : गणरायाच्या आगमनासाठी आता मोजकेच दिवस राहिल्याने गणेशभक्तांकडून जय्यत तयारी केली जात आहे. यावर्षी 10 दिवस विराजमान होणाऱ्या गणरायासाठी आकर्षक व सुंदर मखर बाजारात दाखल झाल्या आहेत. रबरी, फोम, थर्माकोलसह कापडी मखरही गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. याचबरोबर देखाव्यांप्रमाणे डिजिटल प्रिंटिंग करून घेण्याकडेही गणेशभक्तांचा ओढा आहे. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने खरेदीला उधाण आले आहे. बेळगाव शहर मोठी बाजारपेठ असल्याने गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. शनिवारी सेकंड सॅटर्डे तर रविवारी विकेंड असल्यामुळे बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी तुफान गर्दी झाली होती. गणरायाच्या आगमनासाठी मखर महत्त्वाचे असते. त्यामुळे मखर खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडे बाजार आदी परिसरात ठिकठिकाणी आकर्षक मखरांची विक्री केली जात आहे.
यापूर्वी केवळ थर्माकोलचे मखर बाजारात उपलब्ध व्हायचे. परंतु मागील दोन-तीन वर्षांत रबर व फोममध्येही सुंदर नक्षीकाम असलेले मखर तयार होत आहेत. वजनाने हलका असणारा फोम वाहतुकीसाठी सोयीचा ठरत असल्याने फोमच्या मखरांची विक्री वाढली आहे. कार्डबोर्डच्या मखरांमध्ये सुंदर नक्षीकाम केलेली लायटिंग बसविण्यात आली आहे. यामुळे नवीन काही तरी खरेदी करण्याचा प्रयत्न गणेशभक्त करीत आहेत. मखरांपेक्षा काही गणेशभक्त डिजिटल बोर्डचा वापर करून देखावे करीत आहेत. देखाव्यांसाठी लागणारे बॅकग्राऊंड डिजिटल बोर्डवर प्रिंटिंग करून घेतले जात आहे. घरगुती गणेशमूर्तीसमोर देखावे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डिजिटल बोर्डला मागणी वाढत आहे.
किमतीत पाच टक्के वाढ
थर्माकोल मखरांच्या किमतीत वाढ झाली नसली तरी इतर मखरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मजुरीमध्ये वाढ झाल्याने सरासरी 5 टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे. थर्माकोलचे मखर 500 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. फोमचे मखर 1000 ते 4000 रु. तर डिजिटल प्रिंट असलेले मखर 4000 ते 10000 पर्यंत आकारानुसार बेळगावमध्ये विक्री केले जात आहेत.









