आता नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन
बेळगाव : अशोकनगर येथील ब्लॅकस्पॉट पूर्णपणे हटविण्यात आला. त्या ठिकाणी फलक उभे करुन फुलांची रांगोळी देखील घालण्यात आली. याचबरोबर झाडाच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र जनतेनेही तितकेच सहकार्य करणे गरजेचे आहे. अशोकनगर येथे गेल्या काही वर्षांपासून कचऱ्याचे ढीग पडत होते. रस्त्याला लागूनच कचऱ्याचा ढीग राहिल्यामुळे भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला होता. ही कुत्री अनेकवेळा लहान मुले तसेच नागरिकांवर हल्ला करत होती. रात्रीच्यावेळी या परिसरातून जाणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे तातडीने हा ब्लॅकस्पॉट हटवावा, अशी मागणी होत होती. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा ब्लॅकस्पॉट हटविला आहे. आता जनतेने त्या ठिकाणी कचरा टाकायचा बंद करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यावेळी सदर वॉर्डाच्या नगरसेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.









