बागायत खात्याकडून प्रोत्साहन : तब्बल 145 हेक्टर क्षेत्रात चंदनाची लागवड
बेळगाव : जिल्ह्यात चंदन शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. बागायत खात्याच्या मार्गदर्शनाखाली अलीकडे चंदनाच्या रोपांची लागवड वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चंदनाचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला आहे. जिल्ह्यात 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 145 हेक्टर क्षेत्रात चंदनाची लागवड झाली आहे. त्यामुळे साहजिकच चंदनचे उत्पादन वाढताना दिसत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम, वाढती महागाई, नैसर्गिक आपत्ती, अयोग्य हमीभाव, मजुरांची टंचाई, बी-बियाणे आणि खताच्या वाढत्या किमती आदी कारणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी बागायती शेतीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे चंदन रोपांची लागवड वाढू लागली आहे. जिल्ह्यात 20 हेक्टरात चंदनाची लागवड करण्यात येत होती. मात्र, आता त्यामध्ये 145 हेक्टरची भर पडली आहे. बागायत खात्याकडून मिळणारे अनुदान आणि प्रोत्साहनामुळे हे शक्य होऊ लागले आहे. दरम्यान शासनाने चंदन विक्रीस परवानगी दिल्याने अलीकडे लागवड वाढू लागली आहे. केवळ दोन वर्षांत विविध ठिकाणी शेकडो एकरात चंदन फुलताना दिसू लागला आहे. चंदनाची लागवड झाल्यानंतर 10 ते 15 वर्षांनंतर उत्पादन सुरू होते. यामध्ये समाधानकारक उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. मध्यंतरी चंदन लागवडीसाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे लागवडीत घट झाली होती. मात्र, आता हळूहळू शेतकरी चंदन लागवडीकडे वळू लागले आहेत. या रोपांना पाण्याची गरज कमी असल्याने कमी पावसाच्या शेतातदेखील याचे संवर्धन होते.
बाजारात चांगला भाव
बाजारात चंदनाला प्रति किलो 6 ते 8 हजार रुपये भाव आहे. 10 ते 12 वर्षाच्या एका झाडापासून 50 ते 80 किलो चंदन उपलब्ध होते. त्यामुळे लाखो रुपये उत्पन्न एका झाडापासून मिळू शकते.
प्रतीक्षा महत्त्वाची
चंदन रोपांची लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्षानंतर उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे चंदन शेतीत प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना उत्पादनासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे काही शेतकरी चंदन शेतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, एकदा उत्पन्न सुरू झाले की लाखो रुपये प्राप्त होतात. चंदनाच्या उत्पन्नाबरोबर त्याच्या बियाणाची देखील विक्री करता येते. एका झाडापासून साधारण 15 ते 20 किलो बिया मिळतात. बाजारात 1500 ते 2000 रुपये प्रति किलो या बियांचा दरआहे.
बागायत खात्यामार्फत लागवडीसाठी मार्गदर्शन
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी चंदनाच्या रोपांची लागवड केली आहे. खात्यामार्फत लागवडीसाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे चंदन उत्पादनाबरोबर बियांची देखील विक्री करता येते. शेतकऱ्यांना चंदनाची शेती विषयी महत्त्व वाढू लागले आहे.
– महांतेश मुरगोड (बागायत खाते, सहसंचालक)
साडेचार एकर क्षेत्रात चंदन रोपांची लागवड
तीन वर्षापूर्वी साडेचार एकर क्षेत्रात चंदन रोपांची लागवड केली आहे. तब्बल 1300 हून अधिक रोपांचे संवर्धन झाले आहे. बागायत खात्याचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळू लागले आहे. कमी पाण्याच्या क्षेत्रात चंदन शेती करता येते.
– राजू पाटील (चंदन लागवड शेतकरी)









