जनावरांना घरोघरी उपचार : हेल्पलाईन सेवेत, पशुपालकांना दिलासा
बेळगाव : मागील वर्षभरापासून जाग्यावर पडून असलेल्या फिरत्या पशुचिकित्सालयाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना आता गोठ्यापर्यंत उपचार उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील जनावरांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंगोपन खात्याच्या ताफ्यात 17 फिरती पशुचिकित्सालये दाखल झाली आहेत. ही फिरती पशुचिकित्सालये आता अॅक्शन मोडवर आल्याने जनावरांना घरोघरी उपचार मिळणार आहे. दुर्गम आणि वाडी-वस्त्यांवरील जनावरांना वेळेत उपचार मिळावेत. यासाठी फिरती पशुचिकित्सालय देण्यात आली आहेत. मात्र पशुवैद्यकीय अधिकारी आणि वाहनचालकाअभावी ती गतवर्षापासून जाग्यावर पडून होती. शिवाय यासाठी निविदा देखील मागविण्यात आली होती. मात्र यालादेखील प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता पुणे येथील एका कंपनीने पशु चिकित्सालयाचे कंत्राट घेतले आहे. दरम्यान कंपनीने या वाहनांवर एक पशुवैद्यकीय अधिकारी व वाहनचालकांची नेमणूक केली आहे. बुधवारपासून या फिरत्या पशु चिकित्सालयाच्या सेवेला जोमाने प्रारंभ झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यात 17 फिरती पशुचिकित्सालय मिळाली आहेत. प्रत्येक तालुक्यात या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. शिवाय याचा लाभ घेण्यासाठी 1962 हा टोल क्रमांकदेखील सुरू करण्यात आला आहे. यावर संपर्क साधल्यास तातडीने घरोघरी जाऊन जनावरांना सेवा पुरविली जाणार आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर, बैल, ससे, घोडा, गाढव, कुत्रे, मांजर आदीचा समावेश आहे. या सर्व जनावरांना या फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या फिरत्या पशुचिकित्सालयाच्या माध्यमातून जनावरांच्या गोठ्यापर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत. लसीकरण, कृत्रिम गर्भधारणा, औषधोपचार आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील काही पशुवैद्यकीय दवाखाने 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत हे फिरते पशुचिकित्सालय उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक फिरत्या पशुचिकित्सालयावर एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक पर्यवेक्षक आणि एक वाहनचालक नेमण्यात आला आहे.
हेल्पलाईन नंबर सेवेत
जनावरांना फिरत्या पशुचिकित्सालयाच्या माध्यमातून तात्काळ उपचार मिळाले आहेत. यासाठी 1962 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास हे फिरते पशुचिकित्सालय दाखल होणार आहे.









