वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे झालेल्या 21 व्या मुस्तफा हर्जुलाहोविच मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत अखेरच्या भारताच्या मंजू रानीने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने शेवटच्या दिवशी 9 सुवर्णांसह एकूण 10 पदके पटकावली. बोस्नियातील साराजेव्हो येथे ही स्पर्धा झाली.
महिलांच्या 50 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत मंजूने शानदार प्रदर्शन करीत अफगाणच्या सादिया ब्रोमांडचा 3-0 असा पराभव केला. तिच्या चमकदार खेळामुळे तिला स्पर्धेतील सर्वोत्तम महिला बॉक्सरचा बहुमानही मिळाला.
पुरुषांच्या 51 किलो वजन गटात बरुण सिंग शागोलशेमने पोलंडच्या याकुब स्लोमिन्स्कवर 3-0 अशी एकतर्फी मात करीत सुवर्ण घेतले. पुरुषांच्या 57 किलो वजन गटात आकाश कुमार झुंजार लढत दिली. पण त्याला स्वीडनच्या हादी हॅड्रसकडून 2-1 असा निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य मिळाले. पुरुषांच्या 63 किलो गटात मनीष कौशिकने वर्चस्व राखत पॅलेस्टाईनच्या मोहम्मद सौदवर 3-0 अशी मात करीत जेतेपद पटकावले. 92 किलो गटाच्या चुरशीच्या अंतिम लढतीतही भारताच्या नवीन कुमारने संघर्ष करीत पोलंडच्या मॅट्यूज बेरेझनिकीवर 2-1 असा निसटता विजय मिळविला. महिलांच्या ज्योती, शशी, जिज्ञासा तसेच सतीश कुमार यांनीही अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सुवर्णपदके मिळविली.









