वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेची टीनेज महिला टेनिसपटू कोको गॉफने वयाच्या 19 व्या वर्षी पहिले ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्याचा विक्रम केला. येथे झालेल्या 2023 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत गॉफने अंतिम सामन्यात अनुभवी साबालेंकाचा पराभव केला.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कोको गॉफने आर्यना साबालेंकाचा येथील आर्थर अॅश स्टेडियमवर 2-6, 6-3, 6-2 अशा सेटमध्ये पराभव करत आपल्या वैयक्तीक टेनिस कारकिर्दीतील पहिले ग्रॅन्डस्लॅम जेतेपद पटकाविले. फ्लोरीडात वास्तव्य करणारी गॉफ ही अमेरिकेतील या प्रमुख स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी 1999 नंतरची सर्वात कमी वयाची अमेरिकन महिला टेनिसपटू ठरली आहे. 1999 साली माजी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने असा पराक्रम केला होता. गॉफ आणि साबालेंका यांच्या या अंतिम सामन्याला अमेरिकेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश होता. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये गॉफने आपल्या वयाच्या 15 व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या इतिहासात पात्र ठरणारी पहिली महिला टेनिसपटू ठरली होती. 2019 साली विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पदार्पण करताना गॉफने चौथी फेरी गाठली होती. गेल्यावर्षी गॉफने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण पोलंडच्या टॉपसीडेड स्वायटेकने गॉफचा पराभव करून जेतेपद मिळविल्याने गॉफला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
गेल्या जुलै महिन्यात झालेल्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत गॉफला पहिल्याच फेरीत पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर तिने झालेल्या 19 पैकी 18 सामन्यात विजय नोंदविले. अलिकडच्या कालावधीत तिचा हा सलग बारावा विजय आहे. गॉफला ब्रॅड गिलबर्ट आणि पेरी रिबा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. गॉफ आणि साबालेंका यांच्यातील या अंतिम सामन्यात गॉफकडून 46 अनियंत्रित चुका नेंदविल्या गेल्या. या सामन्यात गॉफचा खेळ अप्रतिम झाला. तसेच तिने आपला बचावात्मक खेळ अप्रतिम केल्याची कबुली साबालेंकाने या सामन्यानंतर दिली.
या अंतिम सामन्यात गॉफने आपल्या अचुक आणि वेगवान सर्व्हिसच्या जोरावर 4-0 अशी आघाडी पहिल्या सेटमध्ये घेऊन त्यानंतर हा सेट 6-2 असा जिंकत गॉफवर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर पुढील दोन सेटस्मध्ये साबालेंकाडून वारंवार चुका झाल्याने त्याचा लाभ गॉफने पुरेपूर उठविला. बेलारूसच्या 25 वर्षीय साबालेन्काला दुसऱ्या सेटमध्ये केवळ 3 तर तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये केवळ दोन गेम्स जिंकता आले. गॉफने शेवटच्या दोन सेटमध्ये आपला डावपेचात बदल करत बेसलाईन खेळावर अधिक भर देत साबालेंकाला वारंवार नेटजवळ खेचल्याने परतीचे फटके मारताना साबालेंकाची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.
अमेरिकेन ग्रॅन्डस्लॅम खुल्या टेनिस स्पर्धेला 1973 मध्ये प्रारंभ झाला आणि या स्पर्धेचे 2023 हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धा आयोजकांनी या स्पर्धेतील पुरूष आणि महिला विभागातील विजेत्यांना बक्षिसाची समान रक्कम देण्याची घोषणा केली. गॉफला या जेतेपदाबरोबरच 30 लाख डॉलर्सचे बक्षिस मान्यवरांकडून देण्यात आले. 25 वर्षीय साबालेंका आता पुढील आठवड्यात घोषित होणाऱ्या महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर राहिल. गॉफ ही तिसऱ्या स्थानावर राहिल. या अंतिम सामन्याला सुमारे 23 हजार प्रेक्षक उपस्थित होते. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला अमेरिकेच्या माजी टेनिसपटू बिली जिन किंग उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते गॉफला आकर्षक चषक आणि बक्षिस रकमेचा धनादेश देण्यात आला.
डॅनीलिना- हेलिओव्हारा विजेते
या स्पर्धेत कझाकस्तानची अॅना डॅनीलिना व फिनलँडचा हॅरी हेलिओव्हारा यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात टॉप सीडेड जोडी जेसिका पेगुला आणि ऑस्टिन क्रायसेक यांचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत अजिंक्यपद पटकाविले. हा अंतिम सामना 72 मिनिटे चालला होता.









