बायडेन यांना मोदींचा संदेश : ‘क्वाड’ बैठक झाल्यास भारताचा जागतिक मंच पुन्हा एकदा सजणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जी-20 मध्ये सामील झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हिएतनामला रवाना झाले. मात्र, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जानेवारी 2024 मध्ये भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. जो बायडेन यांनी कृपापूर्वक हे मान्य केले आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते सहभागी होऊ शकतात. किंवा याचदरम्यान भारतात ‘क्वाड’ परिषदेचे आयोजन करून त्यांना आमंत्रित केले जाऊ शकते. अमेरिकेसोबतच जपान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन अन्य क्वाड सदस्य देशदेखील जानेवारी 2024 मध्ये भारतात येतील यासाठीही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून प्रयत्न चालवले जात आहेत. पुढील वर्षी पुन्हा बड्या राष्ट्रांमधील जागतिक नेत्यांची मांदियाळी दिसून आल्यास नवी दिल्लीचा हा एक मोठा राजनैतिक विजय ठरणार आहे.
चीनला छह देण्यासाठी अमेरिका भारताशी मैत्रीपूर्ण संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकाही भारताशी सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तथापि, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर चीनची नजर असल्याचे राजनैतिक वर्तुळात मानले जात आहे. चीन याकडे अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापारयुद्धातील शत्रुत्व म्हणून पाहतो. आशियातील चीननंतर भारताकडे प्रत्येक आघाडीवर दुसऱ्या क्रमांकाची क्षमता आहे. मात्र, अमेरिका, चीन आणि भारत यांच्यातील संबंधांवरही परस्पर विश्वासाचे संकट आहे. परराष्ट्र मंत्रालयातील अनेक माजी मुत्सद्दी विश्वासाच्या या संकटाची शक्मयता नाकारत नाहीत.
अमेरिका आणि चीनची उद्दिष्टे वेगळी आहेत. याचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. दोन्ही मोठे देश आपापला जम बसवण्यात व्यस्त आहेत. चीनची सौदी अरेबियासह अनेक देशांशी जवळीक वाढत आहे. अमेरिकेला हे आवडत नाही. अमेरिकन अर्थव्यवस्थेप्रमाणेच चीनची बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थाही प्रचंड दबावाखाली आहे. तेथे बेरोजगारी आणि घरगुती समस्या वाढत आहेत. आणि या सगळ्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमधील परस्पर अंतर हे आहे. पण दोन्ही देशांतील परस्पर संबंध पूर्वीप्रमाणे ऊळावर आले तर भू-राजकीय परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चीन आणि भारत यांच्यातील संबंधांची अमेरिकेलाही चिंता आहे. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात भारत आणि चीनमधील समन्वय कमी झाला आहे. ही परिस्थिती भारत आणि अमेरिकेसाठी संधीसारखी आहे. मात्र, त्याचा भारतावरही परिणाम होत असल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि भागीदारीचे नाते प्रगत होत आहे. अमेरिकेचे रणनीतीकारही याबाबत दक्ष असल्याचे दिसून येत आहे.
अन्य देशांच्या नेत्यांनाही निरोप
परिषदेचा समारोप झाल्यानंतर पूर्वनियोजनानुसार विविध राष्ट्रांचे प्रमुख मायदेशी परतण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी सायंकाळनंतरच नेते माघारी परतण्यास सुरुवात झाली असून सोमवारपर्यंत वेगवेगळ्या वेळी नेतेमंडळी रवाना होणार आहेत. पंतप्रधान स्वत: सर्व महत्त्वाच्या नेत्यांना निरोप देत असून इतर सहकारी केंद्रीय मंत्री आणि अधिकारी यांच्याकडूनही त्यांच्या निरोपपर सोहळ्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.