वृत्तसंस्था/ मॅराकेच
मोरोक्कोमध्ये 8 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने या आफ्रिकन देशात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपानंतर 48 तास उलटूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. हजारो जखमींना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रलयंकारी भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. अल जझिराने दिलेल्या माहितीनुसार, मोरोक्कोमध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मदत व बचावकार्यात सशस्त्र दलांना समाविष्ट करून घेण्यात आले असून सर्जिकल फील्ड हॉस्पिटल तैनात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, मोरोक्कोला मदत करण्यासाठी विविध देश पुढे सरसावले असून त्यांना आर्थिक आणि वस्तूंच्या स्वरुपात मदत पुरविण्यास प्रारंभही झाला आहे.
मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतांना हादरवणाऱ्या भूकंपाच्या केंद्राच्या सर्वात जवळ असलेल्या मॅराकेचमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाले आहे. परंतु सर्वाधिक मृत्यू अल-हौज आणि तारौदंत प्रांतांच्या दक्षिणेकडील पर्वतीय भागात नोंदवले गेले आहेत. दरम्यान, शोध आणि बचाव पथके ढिगारे हटवण्यात आणि रस्ते मोकळे करण्यात व्यस्त आहेत. दक्षिणेकडील सिदी इफ्नीपासून उत्तरेकडील राबात आणि पलीकडेही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.