वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत दुपारच्या जेवणादरम्यान चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशीही चर्चा केली. याशिवाय त्यांनी कोमोरोस, तुर्की, युएई, दक्षिण कोरिया, ब्राझील, नायजेरिया आणि ईयू या देशांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.
जी-20 च्या बॅनरखाली पंतप्रधान मोदींनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तसेच कॅनडाचे नेतृत्त्व करणारे ट्रुडो यांच्याशी भारत-कॅनडा संबंधांच्या प्रत्येक पैलूंवर चर्चा केल्याचे मोदींनी सांगितले. त्याव्यतिरिक्त मॅक्रॉन यांच्याशी आपली खूप चांगली चर्चा झाली असून आम्ही दोन्ही देशांमधील संबंधांना नव्या उंचीवर नेऊ, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
वृक्षारोपण समारंभ
जी-20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारत मंडपम येथे वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला होता. ऐतिहासिक जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, जी-20 शिखर परिषदेने रशिया-युव्रेन युद्धावरील प्रमुख मतभेद बाजूला ठेवून एक घोषणा स्वीकारल्यानंतर भारताने एक मोठा राजनैतिक विजय मिळवला. तसेच आफ्रिकन युनियनचा स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली. जी-20 चे अध्यक्ष असलेल्या भारताने या वषीच्या शिखर परिषदेची थीम ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी अधोरेखित केली होती.









