पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत मंदिरात जलाभिषेक
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे वेळेवेळी स्वत:च्या धर्माबद्दलची श्रद्धा दाखवून देत असतात. हिंदू असल्याचा गर्व असल्याचे सुनक यांनी अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. जी-20 शिखर परिषदेदरम्यान देखील त्यांनी हिंदू धर्मावर आपली किती श्रद्धा हे दाखवून दिले आहे.
ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत रविवारी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात जात दर्शन घेतले आहे. स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने या दोघांना मुख्य मंदिरात नेत पूजा करविली आहे. मुख्य मंदिरामागील आणखी एका मंदिरात त्यांनी जलाभिषेक केला आहे. त्यांच्या सुरक्षेकरता मंदिरात तसेच बाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनक यावेळी एक राजकीय नेता किंवा पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक भक्त म्हणून येथे आले होते, असे वक्तव्य अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे यांनी केले आहे.
मंदिराचे प्रारुप प्रदान
ऋषी सुनक यांना पूर्ण मंदिर परिसराची माहिती देत त्यांना मंदिराचे एक प्रारुप स्मृतिचिन्ह म्हणून प्रदान केले आहे. ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती दोघेही अत्यंत श्रद्धाळू व्यक्ती आहेत असे दवे यांनी म्हटले आहे.
मंदिर भेटीचे दिले होते संकेत
हिंदू असल्याचा मला गर्व आहे. हिंदू म्हणूनच मी लहानाचा मोठा झालो आहे. अलिकडेच मी रक्षाबंधन सण साजरा केला होता. परंतु पुरेसा वेळ न मिळाल्याने जन्माष्टमीत भाग घेता आलेला नाही. त्याची भरपाई एखाद्या मंदिरात जात करता येईल अशी अपेक्षा असल्याचे सुनक यांनी शनिवारी म्हटले होते.









