जिल्हा सीईएन विभागाची कारवाई : दोन महिलांची झाली होती फसवणूक : जागृती करूनही सुशिक्षित नागरिक गुन्हेगारांच्या गळाला
बेळगाव : टेलिग्रामच्या माध्यमातून बेळगाव जिल्ह्यातील दोन सुशिक्षित महिलांची फसवणूक केली होती. जादा परतावा देण्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी या महिलांना लाखो रुपयांना गंडविले होते. जिल्हा सीईएन पोलिसांनी दोन प्रकरणांत 46 लाख 15 हजार रुपये गोठविले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर.गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून सायबर गुन्हेगारांनी ठकविलेली रक्कम परत मिळविण्यासाठी त्यांची तब्बल 21 बँक खाती गोठविण्यात आली आहेत. स्वत: पोलीसप्रमुखांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. 21 ऑगस्ट रोजी ‘तरुण भारत’ने टेलिग्रामच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीविषयी ‘झटपट श्रीमंती…अधिकाधिक परतावा…फसवणुकीचा धडा नवा! या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. रायबाग येथील डॉ. शिल्पा शिरगण्णावर यांना दि. 25 ते 28 ऑगस्ट या काळात 27 लाख 74 हजार रुपयांना गंडविण्यात आले होते. टेलिग्रामच्या माध्यमातून व्यवसायात होणाऱ्या पहिल्या तीन गुंतवणुकीसाठी भरपूर परतावा देण्याचे सांगून सायबर गुन्हेगारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविण्यास भाग पाडले होते. गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून डॉ. शिल्पा यांनी ऑनलाईन रक्कम जमा केली होती.
याचप्रमाणे निपाणी येथील आशा कोटीवाले यांनाही सायबर गुन्हेगारांनी 18 लाख 41 हजार रुपयांना गंडविले होते. या दोन्ही प्रकरणांची जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात नोंद झाली होती. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर गुन्हेगारांनी ज्या बँक खात्यात रक्कम जमा करून घेतली ती 21 खाती गोठवून 46 लाख 15 हजार रुपये परत मिळविण्यात यश मिळविले आहे. अधिकाधिक परतावा देण्याचे सांगून टेलिग्रामवर चॅटिंग करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या गळाला सुशिक्षित नागरिक लागत आहेत. कोट्यावधीची फसवणूक करून गुन्हेगार नंतर फोन बंद करतात. सायबर क्राईम विभागाकडून वारंवार जागृती करूनही सुशिक्षित नागरिक या गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिकांनी अडकू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे.









