वृत्तसंस्था/ कोलंबो
खराब हवामानाचा अडथळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन आशियाई क्रिकेट मंडळाने (एसीसी) रविवारी 10 सप्टेंबर रोजी होणार असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘सुपर फोर’ फेरीतील सामन्यासाठी विशेष राखीव दिवस जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, श्रीलंकेतील ‘सुपर फोर’ स्तरावरील इतर कोणत्याही सामन्यांसाठी राखीव दिवस असणार नाही.
याचा अर्थ असा की, जर 10 रोजीच्या महत्त्वाच्या लढतीदरम्यान पावसाने खेळ पूर्ण होऊ दिला नाही, तर ज्या टप्प्यावर सामना थांबला होता तेथून तो दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. ‘एसीसी’ने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘10 रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असलेल्या पाकिस्तान आणि भारत यांच्यातील ‘आशिया चषक सुपर फोर’ स्तराच्या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या सामन्यादरम्यान प्रतिकूल हवामानामुळे खेळ थांबवावा लागला, तर सामना जेथे स्थगित करण्यात आला होता तेथून 11 रोजी पुढे सुरू होईल’.
17 रोजी खेळल्या जाणार असलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळीही लंकेच्या राजधानीत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून ते लक्षात घेऊन आधीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. ‘एसीसी’ने म्हटले आहे की, अशा परिस्थितीत प्रेक्षक त्यांची सामन्याची तिकिटे ठेवू शकतात, जी राखीव दिवशी वैध असतील.
अलीकडेच, पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शाह यांना पत्र लिहून श्रीलंकेतील सामन्यांना मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे तिकिटांच्या रूपाने येणारा पैसा मोठ्या प्रमाणात गमवावा लागला, याकडे लक्ष वेधले आहे आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील गट स्तरावरील साखळी सामनाही भारतीय डावाच्या समाप्तीनंतर सततच्या पावसामुळे रद्द करावा लागला. होता. ‘एसीसी’कडून पीसीबीला कोणतीही भरपाई दिली जाण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे राखीव दिवस हा सर्वांत चांगला तोडगा काढण्यात आला आहे.









