ग्रँडस्लॅम दुहेरीची अंतिम फेरी गाठणारा बोपण्णा बनला सर्वात वयस्कर खेळाडू
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा आस्ट्रेलियन जोडीदार मँथ्यू एब्डन यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीतील विजयी घोडदौड कायम राखत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे. उपांत्य लढतीत जोडीने फ्रान्सच्या पियरी ह्युजेस हर्बर्ट व निकोलस मेहुत यांच्यावर सरळ सेट्सनी मात करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. कनिष्ठ मुलांच्य दुहेरीत भारताच्या आर्यन शहानेही कोरियन जोडीदारासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
ग्रँडस्लॅममध्ये पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठण्याची बोपण्णाची ही दुसरी वेळ आहे. ही सहावी मानांकित जोडी यावर्षी झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. येथे त्यांनी हर्बर्ट-मेहुत यांच्यावर 7-6 (7-3), 6-2 अशी मात केली. ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा 43 वर्षीय बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. याबाबतीत त्याने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा विक्रम दोन महिन्यांच्या फरकाने मागे टाकला. नेस्टरने ग्रँडस्लॅमची अंतिम गाठली तेव्हा तो 43 वर्षे 4 महिन्यांचा होता.
विशेष म्हणजे बोपण्णाने कारकिर्दीत ग्रँडस्लॅमची पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली ती याच स्पर्धेत. 2010 त्याने पाकच्या ऐसाम उल कुरेशीसमवेत पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळी त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. यावेळी अंतिम फेरीत त्यांची लढत अमेरिकेच्या राजीव राम व जो सॅलिसबरी किंवा इव्हान डोडिग व ऑस्टिन क्रायसेक यापैकी एका जोडीशी होईल.
आर्यन शहा उपांत्यपूर्व फेरीत
कनिष्ठ मुलांच्या दुहेरीत भारताचा आर्यन शहा व द.कोरियाचा सेऊंगमिन पार्क यांनी इटलीचा सातव्या मानांकित फेडेरिको सिना व जपानचा रेल साकामोटो यांचे आव्हान 6-3, 7-6 (7-2) असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.









