जी-20 च्या परिषदेस आजपासून प्रारंभ : अमेरिकेच्या अध्यक्षांचे भारतात आगमन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या जी-20 परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेसाठी जागतिक आर्थिक शक्ती असलेल्या देशांचे प्रमुख भारतात पोहोचले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज, संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासह अन्य सदस्य देशांचे प्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा देखील पत्नीसह दिल्लीत पोहोचले आहेत. एकंदर दिल्लीत जागतिक नेत्यांची मांदियाळी जमल्याचे दिसून येत असून जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारत आपली ताकद आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवून देत आहे.

जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी हे 15 जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यातील 3 द्विपक्षीय चर्चा या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत. या दोन्ही नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी हे रविवारी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांची भेट घेत द्विपक्षीय चर्चा केली आहे. यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत त्यांनी द्विपक्षीय बैठक केली आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती अहमद तिनुबु हे गुरुवारीच दिल्लीत दाखल झाले होते. तिनुबे हे जी-20 चे निमंत्रित अतिथी म्हणून परिषदेत सामील होणार आहेत. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीस देखील शुक्रवारी सकाळी भारतात पोहोचले आहेत. तर भारत दौऱ्यापूर्वी स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेज हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्या जागी उपाध्यक्ष नाडिया कॅल्विनो सांतामारिया आणि विदेशमंत्री जोस मॅन्युअल अल्बेरेस परिषदेत भाग घेणार आहेत. इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फतेह अल-सिसी देखील जी-20 परिषदेसाठी भारतात पोहोचले आहेत.

जी-20 या संघटनेचे अध्यक्षत्व भारताला आव्हानात्मक काळात मिळाले आहे. सद्यकाळात जग आर्थिक मंदीसदृश स्थितीतून वाटचाल करत आहे. आम्ही आमच्या अध्यक्षत्वाची थीम ‘वसुधैव कुटुंबकम’ निवडली आहे. भारताचे अध्यक्षत्व सर्वसमावेशक, निर्णायक आणि महत्त्वाकांक्षी असल्याचे उद्गार जी-20 शेरपा अमिताभ कांत यांनी काढले आहेत. तर आफ्रिकन महासंघाला जी-20 चे सदस्यत्व देण्याच्या भारताच्या प्रस्तावाला चीन तसेच युरोपीय महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे.
चीनचे पंतप्रधान भारतात
चीनचे पंतप्रधान ली कियांग हे नवी दिल्लीत पोहोचले आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे जी-20 परिषदेसाठी भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे. पुतीन यांच्या जागी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह हे दिल्लीत दाखल झाले असून तेच रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.
त्रिशूल सराव रोखला
भारतीय वायुदलाने चीन-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेला त्रिशूल सराव रोखला आहे. राफेल, सुखोई, मिग, मिराज आणि चिनूक यासारख्या लढाऊ विमाने-हेलिकॉप्टर्सना जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेकरता तैनात करण्यात आले आहे. भारतीय वायुदल जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली समवेत देशभरातील हवाई क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी स्वत:च्या फाल्कन अवाक्स एअरक्राफ्टचे संचालन करणार आहे. फाल्कन अवाक्स एअरक्राफ्टला आकाशातील नेत्र म्हटले जाते. दिल्लीच्या आसपास असलेली विमानतळे, हिंडन वायुतळ, अंबाला, सिरसा, भटिंडा वायुतळाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. वायुदलाने राफेल लढाऊ विमान, ड्रोनविरोधी यंत्रणेसोबत 70-80 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा भेद करू शकणारी क्षेपणास्त्रs तैनात केली आहेत. कुठलेही अनोळखी विमान किंवा क्षेपणास्त्राचा सुगावा लावण्यासाठी एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. वायुदलाचे पहिले स्वदेशी टेहळणी विमान ‘नेत्र’ दिल्ली विभागातील हवाईक्षेत्रावर नजर ठेवून आहे. आपत्कालीन स्थितीतील मोहिमेसाठी भारत मंडपमनजीक हेलिकॉप्टर तैनात आहे. 200 हून अधिक कमांडोंना सज्ज ठेवण्यात आले आहे.









