वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी रशिया-युक्रेन युद्धासंबंधी भारताने स्वीकारलेल्या धोरणाचे समर्थन केले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अतिशय समतोल आणि योग्य असून असेच धोरण असणे अपेक्षित होते. भारताने या युद्धासंदर्भात शांततेचा पुरस्कार करतानच आपले आर्थिव-राजकीय हित, तसेच सार्वभौमत्व यांचा सन्मान राखला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक समीकरणे निराळी झाली आहेत. या युद्धाचा शेवट केवळ चर्चा आणि संवादातूनच होऊ शकतो. चीन आणि पाश्चिमात्य देश यांच्यातही आता भू-राजकीय दरी निर्माण झाली आहे. अशा परिवर्तित होणाऱ्या जागतिक स्थितीत भारतासारख्या लोकशाहीप्रधान, शांततावादी आणि घटनात्मक मूल्ये मानणाऱ्या देशाला महत्वाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे, असे मतप्रदर्शन त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शुक्रवारी केले.









