कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरासह जिल्हा केला राष्ट्रवादीमय
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरात रविवारी (10 रोजी) होणारी उत्तरदायित्व सभा रेकॉर्ड ब्रेक होईल. कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरासह सबंध जिल्हा राष्ट्रवादीमय केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची तपोवन मैदानावर सभास्थळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रविवारी 10 दुपारी साडेतीन वाजता कावळा नाका येथे छत्रपती ताराराणी पुतळ्याजवळ स्वागत होईल. तेथून मोटार सायकल व चारचाकी रॅलीसह मिरवणुकीने दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर ऐतिहासिक बिंदू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतील. नंतर मिरजकर तिकटीवरून पुढे ही मिरवणूक जाईल. त्यानंतर संभाजीनगर बस स्थानकाच्या स्वागत कमानीपासून पुन्हा ही मिरवणूक सुरू होईल. साडेचार वाजता तपोवन मैदानावरील सभास्थळी पोहोचतील व पाच वाजता उत्तरदायित्व सभा सुरू होईल.
पाटील म्हणाले, या सभेला कोल्हापूर शहरासह सबंध जिल्हाभरातून लोक मोठ्या संख्येने येणार आहेत. सभास्थळाच्या पश्चिम बाजूलाच मोठे मैदान आहे. त्यावरती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची व व्यवस्थाही केलेले आहेत. सभामंडपामध्ये पूर्व बाजूला पुरुष आणि पश्चिम बाजूला स्त्रिया, अशी बैठक व्यवस्था केली आहे. सभेचा मुख्य कार्यक्रम सुरू होईपर्यंत व्यासपीठावर ‘जागो हिंदुस्तानी’ हा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमही आयोजित केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत राष्ट्रवादीचे मंत्री, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, विधानसभा सभापती नरेंद्र झिरवाळ, रामराजे निंबाळकर, आमदार मकरंद पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादीचे सर्वच आमदार सभेसाठी येणार आहेत. पाटील म्हणाले, उत्तरदायित्व सभा वेळेवर सुरू होणार असल्यामुळे लोकांनीही वेळेवरच पोहोचून सभामंडपात बसावे. कोल्हापूर शहरासह जिह्यातील लोकही मैदानाच्या सर्वच बाजूने मोठ्या संख्येने वाहने घेऊन येणार आहेत. त्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंग न करता संयोजकांनी दिलेल्या नियोजनानुसारच पार्किंग करावे.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचना दिल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी येणाऱ्या सर्वच लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. ते घरातून निघाल्यापासून ते सभा संपून घरात पोहोचेपर्यंत ते सुखरूप पोहोचतील याची दक्षता घ्यावी. तसेच गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जेवणाचे नियोजन करून सभेला आलेला एकही माणूस उपाशी जाणार नाही काळजी घ्यावी. अजित पवार जे बोलतात ते करतात. त्यामुळेच सभेला ‘काम बोलतय…….’ ही टॅगलाईन दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, महेंद्र चव्हाण, निखिल कोराने, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, मनोजभाऊ फराकटे, विकास पाटील आदी प्रमुख व विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सभास्थळाला भेट दिली आणि सभास्थळासह मैदानाची पाहणी केली. त्यानी सुरक्षेच्या दृष्टीने व चोख नियोजनाच्यादृष्टीने काही सूचना संयोजकांना दिल्या.