जिह्यातील जनसंवाद यात्रेसाठी हजारोंची उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने 3 सप्टेंबरपासून जिह्यात जनसंवाद पदयात्रा सुरु आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा सुरु असून प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते व जनसामान्यांचा हजारोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (8 रोजी) कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा निघणार असून सायंकाळी 6 वाजता दसरा चौक येथे संवाद सभा होणार आहे. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या यात्रेमध्ये आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यभरात 3 सप्टेंबर पासून ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिह्यात 3 सप्टेबरपासून चंदगड येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. लोक भावना जाणून घेणे हा यात्रेचा मुख्य हेतू आहे. यात्रे दरम्यान महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत लोकांशी संवाद साधला जात आहे. प्रत्येक दिवशी यात्रेचा सकाळचा टप्पा आणि दुपारचा टप्पा असे दोन टप्पे करून त्यानंतर संवाद सभा घेतली जात असून कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला जात आहे.
शनिवारच्या पदयात्रेचा मार्ग
शनिवारी होणारी पदयात्रा दुपारी 3.30 वाजता चिवा बाजार, आपटेनगर येथून सुरुवात होणार आहे. तेथून सरसेनापती संताजी घोरपडे चौक, संभाजीनगर स्टँड, इंदिरासागर हॉल, नंगीवली चौक, लाड चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, सीपीआर येथून यात्रा दसरा चौकात आल्यानंतर तेथे जनसंवाद सभा होणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.









