विशेषवृत्त सदाशिव आंबोशे
जैव विविधतेने नटलेले पण दुर्लक्षित असलेले कागल तालुक्यातील माद्याळ पठार पर्यटकांना खुणावत आहे. सातारा जिह्यातील ‘कास‘ पठारावर जशी जैव विविधता आढळते, तशीच इथं जैवविविधता असून, आता हा पठार रान फुलांनी बहरलेला आहे. त्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. विविध पक्षासह राष्ट्रीय पक्षी म्हणून ज्याची ओळख आहे, अशा मोर पक्ष्यांचा येथे मोठा वावर आहे.
कागल तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणून माद्याळ आणि माद्याळ-हुडा परिसर व आजरा तालुक्यातील धामणे गावाचा डोंगर भाग असलेल्या पठारावर हा भाग विखुरलेला आहे. माद्याळ-हुडा ते धामणे हा नव्याने झालेला रस्ता असून या रस्त्यालगतच सुमारे एक ते दीड किलोमीटरचा असलेला हा पठार आहे. येथेच हे रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेला आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांना भुरळ पडनार आहे. मात्र हे पठार तसे दुर्लक्षित असल्यामुळे तिकडे कोणीच फारसे फिरकत नाही.
या परिसरात औषधी वनस्पतीही खूप आहेत. विविध प्रकारचे वृक्ष, गवतांच्या जाती या परिसरात आढळून येत आहेत. विविध रंगी-बेरंगी फुलांचे ताटवे आता सजलेले आहेत. येथील पक्षांचे थवेच्या थवे येथे येत आहेत. विविध प्रकारचे भुंगेही येथे येतात. राष्ट्रीय पक्षी म्हणून ज्याची ओळख आहे त्या मोर लांडोरासह ससाणा, सुगरण याशिवाय विविध पक्षांचे इथे ये- जा सुरू असते.
सध्या हा परिसर विविध फुलांच्यासह पिवळ्या रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला आहे. त्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. वन्यजीवांचाही येथे सहवास आहे. फुललेल्या फुलांच्यावर विविध रंगांची फुलपाखरे ही मनमुराद आनंद लुटताना दिसतात. त्यामुळे एक वेगळेच दृश्य पहावयास मिळते. सकाळ, संध्याकाळी तर खूपच नयनरम्य दृश्य असते. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येथील विहंगम दृश्य पाहण्याची मजा औरच असते. तर विविध पक्षांचे आवाज ऐकता ऐकता सुगरणीचे खोपे पहायला मिळतात.
असे वेधले लक्ष…
सेनापती कापशीपासून हे ठिकाण नऊ- दहा किलोमीटर अंतरावर आहे. सायकल ट्रेकिंगसाठी रोज माद्याळहुडा येथे सेनापती कापशीहून शशिकांत खोत, सुनिल चौगले, राजेश उत्तुरे, अजित वंदुरे, सोमनाथ खोत, आर्यन चौगले, विष्वेश खोत हे जातात. ते नेहमी कापशी ते लिंगनूर किंवा कधी- कधी कापशी, माद्याळ, हुडा, धामणे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, काळमा बेलेवाडी, वडगाव असा सायकलवरून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना येथे गेल्यानंतर ही सर्व जैव विविधता पहावयास मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘दै. तरुण भारत संवाद‘ संवाद साधला.
खूप सुंदर परिसर…
सातारा जिह्यातील कास पठार पेक्षाही खूप सुंदर हा परिसर आहे. येथे सर्व वृक्ष, झाडे-झुडपे, विविध रंगांची फुले ही नैसर्गिकरित्या आहेत. विशेष करून या परिसरात मोर-लांडोर यांची संख्या खूप मोठी आहे. याशिवाय इतर पक्षीही येते पहावयास मिळतात. या परिसराकडे जर लक्ष दिले तर चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. याशिवाय पावसाळ्यामध्ये माद्याळहून या परिसरात जाताना मध्येच डोंगरांमध्ये एक छोटा धबधबा आहे. त्याचाही आनंद या पर्यटकांना मिळू शकतो, असे पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांनी सांगितले.









