मडगावातील सभेत भाजपवर जोरदार टीका : भारत जोडो यात्रेचा पहिला वर्धापन दिन
प्रतिनिधी / मडगाव
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत लाखो लोकांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होऊन, देशातून द्वेष काढून टाकण्यासाठी प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश दिला आणि आमचा देश विविधतेचा आदर करतो हे दाखवून दिले. मात्र, या बिगर राजकीय यात्रेने वैफल्यग्रस्त झालेला भारतीय जनता पक्ष काही जुने मुद्दे उपस्थित कऊन जातीय तणाव निर्माण करण्यात व्यस्त असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मडगाव येथील लोहिया मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेच्या पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शिरवडे ते लोहिया मैदान अशी पदयात्रा काढली. नंतर या पदयात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या सभेत सर्वच वक्त्यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, भाजप सरकार भूतकाळातील मृतप्रŽ मांडत आहे आणि सांप्रदायिक भावना भडकावत आहे. हे सरकार या गोष्टीत एवढे व्यस्त आहे की, त्याला राज्यातील ज्वलंत प्रश्न, गंभीर समस्या सोडवण्यासाठीही वेळ मिळत नाही.
जनतेचे काहीच पडलेले नाही
विधानसभेत सर्व विरोधी आमदारांनी जनतेचा आवाज बनून अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सरकारला जनतेचे काहीच पडून गेलेले नाही, हे त्यांनी दिलेल्या उत्तरातून व माहितीद्वारे स्पष्ट होत आहे. गोव्यातील भाजप सरकार कर्जबाजारी झाले आहे. गोव्यात जंगलाचा नाश करण्यात आला. येथील कायदा व सुव्यस्था बिघडली आहे. महागाई वाढली आहे. रस्ते अपघात, खून, विनयभंग, चोऱ्या घडत आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक सुरक्षित नाहीत. लोकांना नको असतानाही राज्यात कोळसा केंद्र तयार करण्यावर जोर देत आहे. गुन्हेगारीवर कुणाचेच नियंत्रण नाही. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.
गोव्यातील जमीन बाहेरच्या लोकांना विकत आहेत. ‘विकासाच्या नावाखाली इथे नगर नियोजन कायद्यात दुऊस्ती केली जात आहे आणि या माध्यामातून ऑर्चर्ड जमीन रूपांतरीत केली जात आहे. प्रत्येक क्षेत्रात भाजप सरकार लूट करीत आहे आणि गोवा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोक म्हादई वाचवण्यासाठी आंदोलने करत असताना, भाजप सरकार प्रत्येक गोष्ट कर्नाटक राज्याला कशी चांगली पडेल या नजरेतून प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. उच्च न्यायालयाने म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचा आदेश देऊनही, भाजप सरकार लोकांच्या विरोधात जाऊन या आदेशाला आव्हान देण्याचे कटकारस्थान करत आहे.
सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ स्थापन केली आहे. त्यांचा धसका भाजपने घेतला आहे. आता ‘भारत’ हे नाव आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. हा त्यांचा पूर्णपणे बालिशपणा आहे, असेही ते म्हणाले.
मोदीनी दिली खोटी आश्वासने
केंद्रात भाजप सत्तेवर आल्यास गोव्याला तीन महिन्यात विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल, गोव्यातील खनिज व्यवसाय सुरू केला जाईल, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख ऊपये जमा केले जातील, विदेशातील काळे धन आणले जाईल अशी आश्वासने दिली होती. पण, दहा वर्षे झाली तरी यातील एकही आश्वासन पाळणे त्यांना शक्य झाले नाही. लोकांना खोटी आश्वासने देऊन मते प्राप्त करीत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही अशी शपथ देवासमोर घेऊन सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांची परिस्थिती सध्या बिकट आहे. उद्या जर निवडणूक झाली तर हे आमदार घरी जातील असे पाटकर यावेळी म्हणाले.
भाजपने देशभरात दुफळी माजविण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना रोखण्याची हीच वेळ असून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार ही संधी सोडणार नाही असा विश्वास दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन यांनी व्यक्त केला. भाजपला आता जर रोखले नाही तर या देशात हुकूमशाही सुरू होईल असेही ते म्हणाले.
केपेचे आमदार अल्टोन डिकॉस्ता, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही आपले विचार मांडले. सभेला माजी केंद्रीयमंत्री अॅड. रमाकांत खलप, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नायक, माजी युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.









