विद्युत रोषणाई, सजावटीने राजधानी खुलली : जागतिक प्रतिनिधींच्या स्वागतासाठी पायघड्या
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष रस्ते, विमानतळ आणि सर्वोच्च न्यायालय रोषणाई आणि रंगरंगोटीने सजवण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिव्यांनी शहराच्या सौंदर्यात भर पडते. भारत मंडपमच्या मुख्य गेटवर नटराजाची मूर्ती साकारण्यात आल्याने संमेलनस्थळाचे सौंदर्य उठून दिसत आहे. दिल्ली विमानतळ सजवण्यात आले असून विशेषत: प्रवेशद्वार कारंजे, पेंटिंग्ज आणि जी-20 लोगोने बनवण्यात आले आहेत. प्रगती मैदानावर नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्रात शिखर परिषद होणार आहे. परिषदस्थळी विद्युत रोषणाई, रंगरंगोटी, सजावट आणि गेटवर नटराजाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. भारत मंडपममध्ये स्थापित केलेली ही नटराजाची मूर्ती ही भारताच्या प्राचीन कलात्मकतेची आणि परंपरांची साक्ष असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. मेट्रो स्टेशनसह अनेक फ्लायओव्हर्सवर जी-20 लोगो चमकत आहेत. जी-20 च्या लोगोसह विविध ठिकाणी साकारण्यात आलेली चित्रे दिल्लीच्या सौदर्यांत भर घालत आहेत. रात्रीच्या दुधाळ प्रकाशात बापूंचे चित्र अतिशय आकर्षक दिसत आहे.
बहुतांश देशांचे प्रतिनिधी आज येणार
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे विमान पालमच्या रनवे 3 वर 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1:20 वाजता उतरेल. अशोक रोडवर असलेल्या सांग्रिला हॉटेलमध्ये सुनक मुक्काम करणार आहेत. तर, जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2:15 वाजता पालम विमानतळाच्या रनवे 1 वर उतरल्यानंतर बाराखंबा रोडवरील ललित हॉटेलमध्ये वास्तव्यास जातील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.15 वाजता पालम विमानतळाच्या रनवे 4 वर उतरतील. तेथून त्यांचा ताफा जनपथ रोडवरील इम्पीरियल हॉटेलमध्ये जाईल. तर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2:35 वाजता पालम विमानतळाच्या रनवे 3 वर उतरतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था बाराखंबा रोडवरील हॉटेल द ललित येथे करण्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:40 वाजता दिल्लीच्या पालम विमानतळाच्या पहिल्या क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरतील. तेथून ते सरदार पटेल मार्गावरील हॉटेल आयटीसी मौर्य येथे रवाना होणार आहेत. त्यांच्यापाठोपाठ काही वेळातच चीनचे पंतप्रधान ली कियांग सायंकाळी 7:55 वाजता पालम विमानतळाच्या धावपट्टी 1 वर उतरतील. येथून ते सरदार पटेल मार्गावरील हॉटेल ताज पॅलेसमध्ये जातील. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला जा सिल्वा 8 सप्टेंबर रोजी रात्री 9.45 वाजता पालम विमानतळाच्या रनवे 3 वर उतरतील. तेथून ते सरदार पटेल मार्गावरील हॉटेल ताज पॅलेसमध्ये जातील. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो 8 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता पालम विमानतळाच्या रनवे 4 वर उतरतील. तेथून ते जनपथ लेनवरील हॉटेल इम्पीरियलमध्ये जातील. या सर्वांशिवाय पॅनडा, युएई, तुर्कीसह इतर अनेक देशांचे राष्ट्रप्रमुखही 8 सप्टेंबरला दिल्लीत दाखल होतील. साहजिकच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पालम ते त्यांच्या मुक्कामाच्या हॉटेल्सपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल. या काळात हे मार्ग सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहेत. जी-20 च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारताने राष्ट्रीय राजधानी क्षेत्राभोवती ड्रोन तैनात केले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गुंजणार
9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी देशाच्या विविध भागातील कलाकार भारत मंडपममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करतील. सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम अशा कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. संगीत सादरीकरणामध्ये सामील असलेल्या काही प्रमुख शैलींमध्ये हिंदुस्थानी संगीत, कर्नाटक संगीत, लोक आणि समकालीन संगीत समाविष्ट असेल. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गाण्याने संगीतमय कार्यक्रम नवी उंची गाठेल असा दावा आयोजकांच्यावतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून भारत वाद्य दर्शनाचे अनोखे संगीत, संगीताच्या माध्यमातून भारताचा सुसंवादी प्रवास सादर केला जाईल. या कार्यक्रमात केवळ शास्त्रीय आणि लोकगीतांना स्थान देण्यात आले आहे. या संगीत कार्यक्रमात एकही बॉलिवूड गाणे वापरलेले नाही. यादरम्यान कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांचे गीतही सादर केले जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांची आहे. राजस्थानी लोककलाकार त्या ठिकाणचे संगीत सादर करतील. गुजरात आणि दक्षिण भारतातील संगीत आणि लोकगीतांनाही या कार्यक्रमात स्थान देण्यात आले आहे.









