मालवण / प्रतिनिधी
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीच्या ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण,जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेची इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या भूगोल व जलसुरक्षा विषयांतर्गत प्रत्यक्ष जलसिंचनाचा अभ्यास व निरीक्षण करण्याच्या दृष्टीने दि. ४ सप्टेंबर रोजी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. ओझर विद्यामंदिर येथून सकाळी निघून वाटेतील भौगोलिक रचनेचा अभ्यास करीत विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी प्रकल्प या नियोजित ठिकाणी पोहोचले. वाटेत क्षेत्रभेटीत सहभागी शिक्षकांनी योग्यते मार्गदर्शन केले. तिलारी याठिकाणी पोहोचताच तेथील मुख्य धरण, त्याच्या बाजूलाच असलेले लहान धरण त्याचप्रमाणे वीज निर्मिती प्रकल्प याठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट देऊन निरिक्षण केले. वीज निर्मिती प्रकल्पामध्ये तेथील अधिकाऱ्यांना काही मुलांनी प्रश्नही विचारले. या क्षेत्रभेटीमुळे भूगोल व जलसुरक्षा विषयाचे ज्ञान वाढण्यास मदत झाली. तसेच या क्षेत्रभेटीमुळे भौगोलिक संकल्पनांचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण होते आणि भूगोलाचा अभ्यास अधिक परिणामकारक होतो. प्रत्यक्ष अध्ययन अनुभव प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थी आनंदात होते. परतीच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी सावंतवाडी येथील मोती तलावाचे निरीक्षण केले व त्याच्या निर्मितीचा हेतू व महत्त्व जाणून घेतले. या क्षेत्रभेटीचे आयोजन प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले. या क्षेत्रभेटीमध्ये शाळेतील साहाय्यक शिक्षक अभय शेर्लेकर, शिवराम सावंत, प्रवीण पारकर व श्रीमती बांदिवडेकर हे सहभागी झाले होते. अशा प्रकारची क्षेत्रभेट शाळेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येते.
Previous Articleमृतांच्या कुटुंबांना, जखमींना भरपाई द्यावी
Next Article राज्यात आजपासून ‘येलो अलर्ट’









