वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
येथे झालेल्या चौथ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा 6 गड्यांनी पराभव करून चार सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडकडून 176 धावांचे आव्हान मिळाले होते. सलामीवीर टिम सीफर्ट (32 चेंडूत 48) व ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत फटकावलेल्या 42 धावांच्या बळावर न्यूझीलंडने 16 चेंडूत बाकी ठेवत विजय साकार केला. मार्क चॅपमनने 25 चेंडूत नाबाद 40 धावा फटकावत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. इंग्लंडने पहिले दोन सामने मोठ्या फरकाने जिंकले होते. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 74 धावांनी हरविले होते. इंग्लंडच्या डावात बेअरस्टोने 41 चेंडूत 6 षटकारांसह 73 धावा फटकावत इंग्लंडला शतकी सलामी दिली. मात्र 11 व्या षटकात 1 बाद 105 अशा भक्कम स्थितीनंतर इंग्लंडचा डाव गडगडला आणि त्यांना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 175 धावांपर्यंत मजल मारता आली. 30 धावांत 3 बळी घेणाऱ्या मिचेल सँटनरला सामनावीराचा बहुमान मिळाला तर बेअरस्टो मालिकावीराचा मानकरी ठरला.
आता या दोन संघांत चार सामन्यांची वनडे मालिका होणार असून यातील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. फलंदाजी केल्यानंतर बेअरस्टो दुखापतीमुळे यष्टिरक्षणासाठी उतरला नव्हता. त्याच्या जागी जोस बटलरने यष्टिरक्षण केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 8 बाद 175, न्यूझीलंड 17.2 षटकांत 4 बाद 179.









