पंतप्रधान मोदींना सोनिया गांधी यांचे पत्र
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन कशासाठी बोलाविण्यात आले आहे आणि त्याची कार्यक्रमसूची काय आहे, अशी विचारणा विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात सोनिया गांधी यांनी पत्र पाठविले असून विरोधी पक्ष यात सहभागी होतील असे आश्वासन दिले आहे.
या अधिवेशनात केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात येतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसेच देशाचे नाव भारत करण्यासंबंधीचा प्रस्तावही मांडण्यात येईल अशी जोरदार चर्चा आहे. काही जणांच्या मते समान नागरी कायद्याचा प्रस्तावही सादर केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप सरकारने कार्यक्रमांची घोषणा न केल्याने सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.
मुद्दे उठविले जाणार
विरोधी पक्षांची ‘आयएनडीआयए’ ही नव्याने स्थापन झालेली आघाडी या अधिवेशनात सहभागी होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आघाडीच्या एक नेत्या सोनिया गांधी यांनी पाठविलेल्या पत्रात विरोधी पक्ष कोणते मुद्दे उपस्थित करतील याची सूची देण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचार, महागाई, बेरोजगारी, कथित चिनी घुसखोरी आणि इतर मुद्दे आम्ही उपस्थित करणार आहोत, असे विरोधी पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या दोन बैठका
काँग्रेसच्या संसदीय धोरण मंडळाची बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बुधवारी घेण्यात आली. याच बैठकीत पंतप्रधान मोदी यांना गांधी यांनी पत्र पाठवून विरोधी पक्षांच्या भूमिकेची कल्पना द्यावी असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही संसदेतील धोरण ठरविण्यासाठी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्वरित आयएनडीआयए आघाडीच्या संसदीय सदस्यांची बैठकही झाली.
सरकारकडून धूळफेकीचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नेहमीच एक नवा कार्यक्रम घोषित करुन जनतेचे लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करते. जनतेची दिशाभूल करण्याचा हा डाव आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षांना काही महत्वाचे मुद्दे उठविण्याची संधी मिळेल अशी आम्हाला आशा आहे, असेही प्रतिपादन या पक्षाच्या नेत्यांनी केले.









