वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेतील केंचुकी येथील लुईसव्हिले या शहराने प्रत्येक वर्षी 3 सप्टेंबर हा दिवस ‘सनातन धर्मदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहराच्या उपमहापौर बार्बारा सेक्सटन यांनी ही घोषणा वाचून दाखविली. या शहराच्या महापौरांना हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
सनातन धर्माचे जन्मस्थान असणाऱ्या भारतात सध्या सनातन धर्माला गाडण्याची भाषा काही राजकीय नेते स्वत:च्या राजकीय लाभाच्या अपेक्षेने करीत आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री स्टॅलिन करुणानिधी यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट होणे आवश्यक आहे, अशी प्रक्षोभक भाषा नुकतीच केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक मंत्रिमंडळातील मंत्री प्रियांक खर्गे यांनी या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे भारतात प्रचंड वादंग निर्माण झाले असतानाच अमेरिकेत एका शहराने सनातन धर्मदिन साजरा करण्याचा निर्णय घेणे महत्वाचे मानले जात आहे.
धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत घोषणा
लुईसव्हिले या शहराच्या उपमहापौरांच्या नेतृत्वात एका कार्यक्रमात सनातन धर्मदिन साजरा करण्याविषयी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला हिंदू धर्माचे अनेक मान्यवर महंत उपस्थित होते. धर्मगुरु चिदानंद सरस्वती, ऋषिकेशच्या परमार्थ निकेतनचे अध्यक्ष श्री श्री रविशंकर, भगवती सरस्वती, केंचुकीच्या उपगव्हर्नर जॅकलिन कोलेमान, आणखी एक अधिकारी कैशा डोर्सी आणि इतर अनेक मान्यवर नेते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि आमंत्रित उपस्थित होते.









