अध्याय एकोणतिसावा
योगाभ्यासासाठी मन एकाग्र करणे आवश्यक आहे परंतु मनाला एकाग्र करणे कठीण असल्याने उद्धव भगवंतांना म्हणाला, देवा, एकवेळ आकाशाची चौघडी करता येईल, महामेरुची पुडी बांधता येईल परंतु मनाच्या ओढीना बांध घालणे अशक्य आहे. कदाचित काळाला जिंकता येईल, त्रिभुवनाची सत्ता मिळवता येईल पण मनोनिग्रहाची वार्ता, अच्युता तुझ्या कृपेशिवाय शक्य होणारी नाही. मी मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना मन क्षणात छळून काढते. नेमस्त लोकांच्या काळजाचा ठोका चुकवून मन त्यांच्या नेमस्तपणाच्या चिंध्या उडवते. मनाची ताकद अफाट असते.
मन कुणाच्याही धैर्याची राखरांगोळी करायला समर्थ असते. मनाला त्याच्यासमोर मी किती धैर्यवान आहे अशी प्रौढी मिरवलेली अजिबात आवडत नाही. सांगायचं तात्पर्य असं की, अच्युता साधनी शिणूनसुद्धा मनोविजय हाती न आलेल्या साधकाला तू कृपा केल्याशिवाय मनोविजय हाती येत नाही. देवा तू म्हणशील त्यात काय अवघड आहे? एकदा माणसाच्या मनाने ठरवले की झाले पण तसं होत नाही. साधना करून माणूस थकला तरी मनाचे नियमन त्याला करता येत नाही उलट त्याची भूक आणखीन वाढते आणि आपले सर्व प्रयत्न वाया गेलेले पाहून माणूस हताश होतो. तेव्हा मनोजय प्राप्त करण्यासाठी तुझ्या कृपेची अत्यंत आवश्यकता आहे. तुला शरण जाणे हेच सगळ्या सारांचे सार आहे. हे लक्षात आल्यावर तुला संपूर्ण शरण जाऊन साधकाने मनोजय साधला रे साधला की, सिद्धी त्यांची वाट अडवून उभ्याच असतात. असे झाले की, मन साधकाला सिद्धीच्या मोहात अडकवून टाकते. शेवटी साधकांना केवळ तुझाच आधार ऊरतो. त्यासाठी ते तुला प्रसन्न करून घेतात. तू प्रसन्न झाल्यावर, तुझ्या कृपेपुढे मात्र मनाचे काही एक चालत नाही. त्यापुढे मन स्वत:चा मनपणा विसरते. म्हणून साधकाने मनोनिग्रह होण्यासाठी तुझे चरण धरावेत. असे केल्यावर तुम्ही कडा फोडून मार्ग दाखवाल किंवा उंच असा पूल बांधून द्याल जेणेकरून साधकाला ब्रह्मप्राप्तीची वाटचाल करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुझ्या चरणांचे तीर्थ ज्याला प्राप्त होते त्याचा मनोजय अंकित होतो. मनोजय साध्य झाल्यामुळे तो आहे त्या परिस्थितीत आनंदात राहू शकतो. त्यामुळे त्याचा स्वभाव विरक्त होतो. त्याच्या आधिव्याधी नाहीशा होतात. त्याचे भवबंधन तुटते. सकळ साधनांचे निजसार असलेले सांख्ययोगविवेक तुझ्या भक्तीने प्राप्त होतो. हे भक्तीचे रहस्य जो आणतो त्याचे हृदय तुझ्याविषयीच्या प्रेमाने भरून जाते. काया वाचा आणि मनाने जे सद्भावे सदा संपन्न असतो अशा भक्ताला तुझे चरण संपूर्ण स्वानंद मिळवून देतात.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्यांची प्राप्ती होण्यासाठी साधने करताना साधकांना अपाय होण्याची शक्यता असते पण तुझी भक्ती अशी नाही. तुला जीवभावाने भजले असता भक्तांना विघ्नांना कधीच तोंड द्यावे लागत नाही. एव्हढेच नव्हे तर तुझ्या कृपेच्या जोरावर भक्तच त्या विघ्नांना पळवून लावतो. त्यामुळे विघ्नांचे भक्ताला त्रास देण्यासाठी त्याच्या मार्गात आडवे यायचे धाडसच होत नाही. त्यामुळे काय वाटेल ते झालं तरी मी तुझी भक्ती करणारच अशा दृढनिश्चयाने संपन्न झालेला असतो. त्याला हात लावायचे काळालाही धाडस होत नाही मग विघ्नांची त्याला त्रास द्यायची काय बिशाद आहे? म्हणून जो मनोभावे तुला सर्व काही विसरून अनन्यशरण येतो त्याच्यासाठी तुझे चरण हे कामधेनुसारखे सर्व मनोरथ पूर्ण करणारे ठरतात. निर्मळ अशा भक्तीसरोवरामध्ये नवविधा भक्तीचे जल भरलेले असते. त्यात तुझे चरणकमल विकसित झालेले असते. भक्ताची भावना पी सावळाराम यांच्या गीतातून छान व्यक्त होते. तूच कर्ता आणि करविता ।शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता, सुखदु:खाची ऊनसाऊली, तुझीच जाणिव वेळोवेळी, तुझ्या कृपेच्या पंखाखाली, जीवदान ते मरणा मिळता.
क्रमश:








