खून, बलात्कार, विनयभंग, फसवणूक व अन्य अनेक गुन्हेगारी घटनांबरोबरच रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या घटनांनी गोव्याची शांतता हरवली आहे. गोव्यातील समाजमनात अस्वस्थता पसरलेली आहे. कधी नव्हे एवढी गुन्हेगारी गोव्यात माजलेली असून भ्रष्ट मानसिकता आणि विकृतीपासून शिक्षण क्षेत्रही मुक्त राहिलेले नाही. गोवा हा खून, रस्ते अपघात, जुगार आणि सेक्स डेस्टिनेशन तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. सोशल मीडिया नावाचे कोलीत नकारात्मतेकडे वळत आहे. हा प्रकार धोकादायक आहे. प्रश्न राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा नाही, सामाजिक नैतिकतेचा आहे. कितीही निंदा नालस्ती झाली तरी आजकाल मंत्री-आमदारांचे काहीही बिघडत नाही. लफडी पचविण्याची ताकद त्यांच्यात असते मात्र हाती कोणतेही पुरावे नसताना कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचे धाडस कुणी करू नये. तो मंत्री असो किंवा सामान्य माणूस…
पैशांच्या बळावर बडे लोक काय काय करू शकतात, हे बाणस्तारीच्या अपघाताने दाखवून दिले. रस्ते अपघातात गोव्यात रोज किमान दोघांचा तरी बळी जात असावा. रस्ता अपघात आणि त्यात बळी जाण्याचे प्रमाण गोव्यात भयावह आहे. यात अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. रविवारी रात्रीही पर्वरीच्या महामार्गावर भीषण अपघातात पुन्हा तिघांचा बळी गेला. बेपर्वाईचे हे बळी. वाढत्या अपघातांना बेपर्वाई, बेशिस्त आणि मस्ती हीच कारणे आहेत. पैशांमुळे माजलेली माणसे स्वत:च संपत असतील तर हरकत नाही मात्र निष्पाप माणसेही इतरांच्या मुजोरीमुळे नाहक मरत असतील तर सरकारने आपल्या वाहतूक धोरणाचा फेरविचार करायलाच हवा. शानशौकीसाठी गाड्या उडविणे, मद्यपान करून बेदरकारपणे वाहन हाकणे हे प्रकार कायमचे बंद व्हायला हवेत. सध्या गोव्यात रस्त्यावरून फिरणारा पादचारीही सुरक्षित राहिलेला नाही. कुणाच्या जीवाचे उद्या काय होईल, काहीही सांगता येत नाही. मागच्या वर्षभरातील अपघातांचा विचार करता भयावह परिस्थितीची जाणीव होते.
जसे भीषण अपघात गोव्यात अस्वस्थता पसरवीत आहेत, त्याचप्रमाणे सर्रास होणाऱ्या खुनाच्या घटनांनी गोवेकरांची झोप उडू लागली आहे. ज्या वेगाने गोव्यात खूनांचे प्रकार वाढत आहेत, ते पाहता कायद्याचा धाक राहिलाच नसल्याचे उघड होते. खून म्हणजे डाव्या हातचा खेळ बनलेला आहे. हे धैर्य परप्रांतातूनच गोव्यात आलेले आहे. याला लगाम बसायलाच हवा. पोलिसांची भीती आणि कायद्याचा धाक महत्त्वाचा आहे. दिवसा दोन-तीन खून होण्याच्या घटना हल्ली गोव्यात घडल्या. मद्य, पैसा, प्रेम, वासना, अनैतिक संबंध अशा कारणांभोवतीच या खुनाच्या घटना फिरत असतात. अन्य गुन्हेगारी घटना तर गोव्याच्या पाचवीलाच पूजलेल्या आहेत. बलात्कार, विनयभंग सारख्या घटना आता फारशा गांभिर्याने घेतल्या जात नाहीत. पोलीस आपले काम करतात. अटक व सुटका आणि नंतर पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता. बलात्कारसुध्दा काही खरे आणि काही खोटे. बलात्काराचा आरोप करून पुरुषांचे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या गुजरातच्या दोन तरुणी पोलिसांच्या हाती लागल्या. इथे पोलिसांचे अभिनंदन व्हायलाच हवे मात्र अशा प्रकारचा धंदा करणारे लोक गोव्यात नाहीत, असे म्हणता येणार नाही. शाळा, महाविद्यालयांसारखी विद्येची मंदिरेही अशा घटनांपासून मुक्त नाहीत. बाल लैंगिक शोषण गोव्यात चिंतेचा विषय आहे. स्वत:च्या बापावरही विश्वास ठेवता येत नाही, अशा गोष्टी हल्ली गोव्यात घडत आहेत. त्यात शिक्षकांवर विश्वास कोण कसा काय ठेवणार! कामांध आणि वासनांध वातावरणाची निर्मिती गोव्याची नवीन डोकेदुखी आहे. दिशाहीन पर्यटन, संस्कारहीन आणि केवळ पोटभरू शिक्षण, स्मार्टफोनचा गैरवापर गोव्याला बदनामीच्या दिशेने घेऊन जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
विविध मार्गाने गोव्याची बदनामी करण्यात परप्रांतीयच आघाडीवर आहेत, यात संशय नसला तरी गोमंतकीय पूर्णपणे निर्दोष किंवा निष्पाप आहेत, असे म्हणता येणार नाही. सध्या गोमंतकीय समाज संभ्रमावस्थेत आहे. बदलत्या परिस्थितीत गोमंतकीय पिढीही आपले मूळ वर्तन बदलण्याचा धोका आहे. गोव्याच्या वाट्याला हल्ली नाहक बदनामी येऊ लागलेली आहे मात्र जागरुक गोमंतकीय समाज या बदनामीला आळा घालू शकतो. बेजबाबदार, बेपर्वाई आणि बेशिस्त वृत्तीला या समाजामध्ये स्थान असता कामा नये. समाजाने राजकारणामागे वाहवत जाऊ नये. अश्लील प्रकरणातही विरोधक आणि समर्थक म्हणून उभे न राहता खरे काय अन् खोटे काय, याची पारख करण्याची क्षमता समाजाने ठेवायला हवी. धरला तर चोर, नाही तर संन्यासी, हे खरे असले तरी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांचे खासगी जीवनही सार्वजनिक असते. चारित्र्याला डाग लागणार नाही, याची खबरदारी त्यांनीच घ्यायची असते.
आजकाल राजकारणाला पातळी राहिलेली नाही. राजकारणात स्वार्थच पुरेपूर भरलेला आहे. इतरांना खाली खेचून आपण कसा मोठा होऊ, हाच विचार राजकीय नेत्यांच्या डोक्यात असतो. बदनामी हे त्यासाठी वापरले जाणारे एक नामी शस्त्र. भ्रष्टाचाराचे कितीही आरोप केले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी एखाद्या महिलेचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरते. जर एखादा नेता कामांध असेल तर त्याला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न होतात. असा प्रयत्न पस्तीस वर्षांपूर्वी हळदोण्यात आणि दोन वर्षांपूर्वी मुरगावात यशस्वी झाला. पस्तीस वर्षांपूर्वी सोशल मीडियाचे नाव कुणी ऐकले नव्हते. कुणाच्या हाती फोनही आला नव्हता मात्र समाज फारच संवेदनशील होता. त्यामुळे वृत्तपत्रातील एखाद्या संवेदनशील बातमीमुळे आंदोलन पेटत होते. कारण ते विश्वासार्ह साधन होते व आजही आहेच. सध्या सोशल मीडियाचा धाक आहे मात्र तो विश्वासार्ह नाही.
माकडाच्या हाती जसे कोलीत असावे, तसे सोशल मीडियाचे झालेले आहे. याच मीडियामुळे नुकतेच दाबोळीतील कथीत कांड चर्चेत आले. ‘शितां आधीच मीठ’ खाण्याचा हा प्रकार. म्हणून हवेतच विरला. सामाजिक माध्यम म्हणजे मुक्त आंदण. कुणीही उठावे आणि हवे तसे, हवे त्याचे, खरे फसवे फोटो, व्हिडीओ उचलून सोशल मीडियावर टाकावे. बदनामी करावी, कौटुंबिक शांती नष्ट करावी, असे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारच्या बदनामीविरुद्ध कायदे आहेत मात्र ते अधिक कडक हवेत आणि त्यासंबंधी जागृतीही हवी. अन्यथा नकारार्थी उपद्व्याप बंद होणार नाहीत. बदनामीच्या चर्चेने राजकीय नेत्यांना फारसा फरक पडत नाही. गुन्हे पचविण्याची क्षमता त्यांच्यात असते. हरले तरी पुन्हा जिंकून येण्याचीही क्षमता असते. प्रश्न त्यांच्या इभ्रतीचा नाही. प्रश्न आहे, सामाजिक नैतिकतेचा व गोव्याच्या बदनामीचा.
अनिलकुमार शिंदे








