परिस्थिती नियंत्रणात असल्याचा सरकारचा दावा
पणजी : सोनसडा येथील कचरा व्यवस्थापनाविषयी सुनावणीस आलेल्या जनहित याचिकेच्या वेळी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कार्यवाही अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर केला. मडगाव येथे प्रतिदिन 35 टन कचरा तयार होतो व त्याची प्रतिदिन विल्हेवाट लावण्यात येते. त्यातील 10 ते 20 टन कचरा काकोडा येथील कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतो, अशी माहिती अहवालातून पीठास देण्यात आली आहे. सोनसडा कचरा विल्हेवाट प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पालन करण्यात येत आहे. तेथील कचऱ्यास वारंवार आग लागते आणि ती धुमसत राहते. त्यावर उपाय म्हणून सोनसडा कचरा यार्डात अग्निशामक यंत्रणा बसवावी म्हणून न्यायालयाने आदेश दिला होता. राज्य सरकारने मडगाव पालिकेसही त्याची कार्यवाही करण्यास बजावले होते. त्याची निविदा लवकरच खोलणार असून जो कोणी कंत्राटदार निश्चित होईल, त्यास काम करण्याचे आदेश लवकर दिले जातील, असे मडगाव पालिकेने न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे. सोनसडा कचरा यार्डमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सरकारतर्फे न्यायालयासमोर करण्यात आला आहे. सदर जनहित याचिका पुन्हा काही दिवसांनी सुनावणीस येणार असून तेव्हा कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे ताजा कार्यवाही अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.









