चोडण-रायबंदर मार्गावरील घटना
पणजी : फेरीसेवेचे अत्याधुनिकीकरण करून कोट्यावधी खर्चाच्या सोलर फेरीसेवा आणण्याच्या गोष्टी करणाऱ्या सरकारला विद्यमान फेरीबोटींची धड देखरेखही ठेवता येत नाही की काय असा सवाल निर्माण झाला आहे. चोडण-रायबंदर फेरीचा तराफा भर समुद्रात तुटण्याच्या घडलेल्या घटनेवरून हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. तसेच या मार्गावरील संपूर्ण फेरीसेवा सुमारे दोन तास विस्कळीत झाली. याचा परिणाम एका ऊग्णवाहिकेवरही झाला. नंतर क्रेनच्या आधारे या फेरीला ओढून धक्क्यावर आणण्यात आले. तेव्हा कुठे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. चोडण-रायबंदर मार्गावर एकुण पाच फेरीबोटी चालतात. राज्यातील सर्वाधिक व्यस्त नदी मार्गापैकी एक असलेल्या या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी आणि हजारोच्या संख्येने वाहनांची वाहतूक करण्यात येत असते. सकाळी कामानिमित्त येणारे आणि सायंकाळी घरी परतणाऱ्या लोकांमुळे या पाचही फेरीबोटी अविश्रांत वाहतूक करत असतात. त्यामुळे त्यांची वेळोवेळी देखरेख होणेही अत्यावश्यक असते.
मंगळवारी सकाळी राजच्या प्रमाणे ’साळ’ ही फेरीबोट धक्क्यावरून सुटल्यानंतर काही क्षणातच तिचा तराफा तुटला. त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंध उडाला. परिणामी या मार्गावरील सर्व फेरीसेवा विस्कळीत झाली. त्यातून नदीच्या दोन्ही बाजूनी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. घटनास्थळी गोंधळ उडाला. सर्व प्रवाशी बराच वेळ अडवून पडले. चोडण भागात तर एका ऊग्णवाहिकेलाही याचा फटका बसला. या फेरीसेवेच्या बाबतीत असे प्रकार घडणे हे नित्याचेच झालेले आहे. कधी फेरीबोटी अचानक नादुऊस्त होतात, कधी भरतीचे पाणी राम्पच्याही वर येते. तर कधी दाट धुक्यामुळे फेरी चालवता येत नाहीत असे प्रकार घडत असतात. त्याही पुढे जाताना अनेकदा कर्मचायांच्या कमतरतेमुळे फेरी बंद ठेवण्याचे प्रकार घडलेले आहेत. नदी परिवहन खात्याची अशी ही निक्रियता रोज समोर येत असताना मंगळवारी घडलेला घटनेने आणखी एका नवीन प्रकाराची त्यात भर घातली आहे. चोडण भागातून पार डिचोली आणि त्यापुढेही जाणारे प्रवासी या फेरीबोटींवर अवलंबून असतात. त्यामुळे येथे पूल बांधावा अशी कित्येक वर्षांपासूनची लोकांची मागणी आहे. नाही म्हणण्यास प्रत्येक निवडणुकीवेळी त्यांना आश्वासनेही देण्यात येतात. परंतु नंतर पुढील निवडणुकीपर्यंत नवीन आश्वासनाची वाट पाहात थांबण्याव्यतिरिक्त येथील लोकांकडे पर्याय नसतो, अशी कैफियत या फेरीबोटीत अडकलेल्या एका प्रवाशाने पत्रकारांशी बोलताना मांडली व सदर प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.









