म्हापसा : सांतारशेत-हळदोणा येथे एका घराच्या आवारातील विहिर उसपताना एका व्यक्तीचा सांगाडा सापडल्याने गावात खळबळ माजली आहे. सदर घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सांगाडा पाहून कामगारांनी विहिरीचे काम अर्ध्यावरच सांडून तेथून पळ काढला. दरम्यान विहीरीत सापडलेला सांगाडा दीड वर्षापूर्वीचा असावा असा पोलिसांचा कयास आहे. घर मालकाने सदर विहिरीच्या साफसफाईचे काम हाती घेतले होते. विहीर उसपताना कामगारांना हा सांगाडा सापडला. सांगाडा विहिरीच्या पाण्यात दिसताच कामगारांनी घाबरून पळ काढला.
या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर सांगाडा विहिरीतून बाहेर काढला आणि पंचनामा करून बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवून दिला. या घराचे घरमालक मुंबई येथे वास्तव्यास आहेत तर त्यांची 80 वर्षांची वृद्ध आत्या एकटीच त्या घरात राहते. दरम्यान गेली काही वर्षे हळदोणा परिसरातील एक गुंड प्रवृत्तीची गँग या घराच्या आवारात रात्रीच्यावेळी दारू आणि इतर अमली पदार्थाच्या नशेत दंगामस्ती करून वाड्यावर गोंधळ घालत होती. या गँगमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता त्यामुळे स्थानिक पोलीस ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत होते. पाच-सहा वर्षे हा प्रकार तिथे चालत होता. या लोकांनी काही ग्रामस्थांना दमही दिला होता. शेवटी नागरिकांनी या प्रकाराबाबत मुंबईत राहणाऱ्या घर मालकाला सांगितले. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी घरात त्यांनी सीसीटिव्ही कॅमेरे बसवले होते. त्यापासून या गँगचा उपद्रव बंद झाला.









