घाटावर विराजमान होणार देवतांच्या पालख्या : शैव, वैष्णवांचा मेळा रंगणार : वझ्याचे साहित्य खरेदीसाठी पडते झुंबड
डिचोली : राज्यासह महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेली नार्वे येथील पंचगंगेच्या तिरावर भरणारी प्रसिद्ध श्रीकृष्ण जन्माष्टमीची जत्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार आहे. शैव व वैष्णवांचे मिलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जत्रेला ऐतिहासिक महत्त्व आहे. दीपवती (दिवडी) बेटावरच्या ‘पोरणे तीर्थ’ येथे होणारी सदर जत्रा आता डिचोली तालुक्मयातील नार्वे या गावात तीर्थार येथे पंच गंगेच्या तिरावर भरते. या जत्रेनिमित्त तिर्थावरील घाटावर परिसरातील विविध देवता येऊन दिवसभर विरजमान होणार आहे.
अनेक वैशिष्ट्यो असलेली ही जत्रा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच आहे. पूर्वकाळात ही जत्रा दिवाडी या बेटावरील नार्वे या गावात होत होती. या बेटावरील हा जत्रोत्सव म्हणजे सर्वात मोठा उत्सव मानला जात असे. मात्र पोर्तुगीजांनी गोमंतकातील वैभवशाली संस्कृती आणि लोकांमधील देवाची श्रद्धा नष्ट करण्याच्या उद्देशाने मंदिरांचे उध्वस्तीकरण आणि बाटाबाटी प्रकार केले. यात दिवाडी बेटावरील नार्वे गावात असलेले अतिप्राचीन महादेवाचे मंदिर उध्वस्त करून टाकले. सदर मंदिर उध्वस्त केल्यानंतर दिवाडी बेटावरील गोकुळाष्टमीचा उत्सवही बंद पाडला. काही वर्षांनंतर येथील लोकांनी महादेवाच्या लिंगाची स्थापन नदीपलीकडे असलेल्या डिचोली तालुक्मयातील हिंदळे (पूर्वीचे नाव) म्हणजेच नार्वे या गावात केली.
शिवभक्त शिवलिंग घेऊन जाताना त्याच्या पाठीवर माडाचे झावळ पडले. देवाचा कौल झाला असे मानून त्यांनी सदर लिंगाची स्थापना नार्वे गावात केली. या परिसरात म्हणजेच डिचोली परिसरात त्यावेळी सावंत वाडकर भोसलेंची राजवट होती. येथे सुरक्षित राहू या उद्देशाने त्यावेळी स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर या हिंदळे म्हणजेच आताचे नार्वे या गावातील तिर्थावर गोकुळाष्टमीची जत्रा साजरी होऊ लागली. या तिर्थावर एक काळभैरव देवाची घुमटी आहे. भाविक या घुमटीतील देवाचे दर्शन घेतात.
या नार्वे तीर्थावर पाच नद्यांचा संगम होतो. जुवारी (कुंभारजुवे कालव्यातून येते), म्हादई, खांडेपार नदी (दुधसागर), वाळवंटी व डिचोली या पाच नद्यांचा संगम होत असल्याने या तीर्थाला पवित्र मानले जाते. या तीर्थाला लागून असलेल्या घाटावर सकाळी पारंपरिक वाटेने नार्वेतील सप्तकोटेश्वर, गिमोणे पिळगावच्या श्री रामाची, वरगाव पिळगाव येथील चामुंडेश्वरी, पिळगावची श्री शांतादुर्गा, नार्वेतील पिसो रवळनाथ, श्री कणकेश्वरी, डिचोलीतील श्री शांतादुर्गा देवीची पालखी दाखल होते. सर्व पालख्या आपापल्या ठिकाणांवर विराजमान होतात. या घाटावर भाविक फिरून बेलपत्र वाहतात आणि देवातांचे दर्शन घेतात. पूर्वी या जत्रेसाठी माशेलच्या देवकीकृष्ण देवाची पालखी जलमार्गे होडीतून यायची. मात्र गेल्या सुमारे 50 वर्षांपूर्वीपासून ती येथे यायची बंद झाली. तरी त्या दिवशी माशेल तारीवाड्यावर जाऊन ते विधी करतात. पोरणेतीर्थ येथे मंदिरात या दिवशी अभिषेक केला जातो. तर नार्वेत पंचगंगेच्या किनारी मोठ्या प्रमाणात भाविकांकडून पितरांचे स्मरण केले जाते. नदीकिनारी स्नान करून असलेल्या ब्राह्मणांमार्फत व्रत उद्यापन करतात. तसेच पतीपत्नी ‘सुपली वायन’ हा विधीही करतात.
या जत्रेत उन पावसाचा खेळ चालूच असतो. राज्य सरकारतर्फे दिवाडी व इतर परिसरातील लोकांना जत्रेला आणण्यासाठी खास फेरीबोटीची सेवा ठेवली जाते. जत्रेत मोठ्या प्रमाणात चतुर्थीला नववधूला देण्यात येणाऱ्या वझ्याचे लाकडी सामान उपलब्ध असते. खास या सामानांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक या जत्रोत्सवात सहभागी होत असतात. तसेच जत्रेच्याच ठिकाणी भाजून गरमागरम चणे उपलब्ध असते. आंब्या फणसाचे ठसाठठ विक्री करणारे बरेचजण असतात. दिवसभर मोठ्या संख्येने लोकांची ये जा या जत्रेला चालूच असते. संध्याकाळी घाटावर विराजमान केलेल्या सर्व देवतांच्या पालख्या पुन्हा पारंपरिक वाटेतून आपापल्या आदिस्थानात जायला निघतात. संध्याकाळनंतर या भागात कोणीही राहू नये, असे जाणकारांकडून सांगितले जाते. त्यामुळेच संध्याकाळीच जत्रा अटोपली जाते.









