जालन्याच्या घटनेबाबत व्यक्त केल्या तीव्र भावना; लवकरच मोर्चा
सांगली : प्रतिनिधी
जालना जिह्यात मराठा आंदोलनास लागलेल्या हिंसक वळणानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवार दि. 7 रोजी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मराठा समाजातील अनेक बांधवांनी आक्रमक होत लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. लवकरच त्याबाबतची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघ कार्यालय येथे मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध करण्यासाठी आयाजित नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थितांनी जालन्याच्या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या व सरकारचा निषेध करून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत होते. मात्र उपोषणस्थळी शुक्रवारी हिंसक वळण लागले. त्याचे पडसाद राज्यात उमटत असून याच पार्श्वभूमीवर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, मारहाण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. हक्काचे आरक्षण सांविधानिक मार्गाने मागताना कोणी असे प्रकार करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील म्हणाले, लोकसभेत सर्वाधिक बहुमत असणाऱ्या पक्षाने ही जबाबदारी घ्यावी, मराठा आरक्षणाचे 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घ्यावा, आता अटीतटीच्या लढा देऊया, अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही. पद्माकर जगदाळे म्हणाले, संसदेत 50 टक्के आरक्षणाची अट रद्द केल्या शिवाय आरक्षण मिळणार नाही, आपण निवडून दिलेल्या खासदारांना आपण जाब विचारायला हवा. वैभव शिंदे म्हणाले, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलवुन मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा. यावेळी विशाल पाटील, शहाजी पाटील, शंभूराज काटकर, सतीश साखळकर, प्रशांत भोसले, अभिजीत भोसले, मंगेश चव्हाण, दिनेश कदम, प्रशांत भोसले, डॉ. संजय पाटील, संभाजी पाटील बेडग, चेतक खंबाळे, दिग्विजय पाटील आदींनी मते व्यक्त केली.
तात्काळ शासन आदेश काढा
मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेऊ, ओबीसीप्रमाणे सर्व योजनांचा लाभ देऊ अशा घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. याबाबत केवळ घोषणा नकोत, तात्काळ शासन निर्णय काढावा, अशी मागणी करण्यात आली.
विनामोबदला केसेस लढणार : अॅड. शिंदे.
अँड. अमित शिंदे म्हणाले, मराठा आंदोलनात आम्ही वकील मित्र सर्व केसेस विनामोबदला आम्ही लढू, असेही त्यांनी आश्वासन दिले.









