बुडामध्ये समाविष्ट करण्यासाठी बैठकीत अनुमोदन : मंगळवारी झालेल्या बैठकीत ठराव
बेळगाव : शहरालगतची 28 गावे बुडाच्या अखत्यारित घेण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला राज्य शासनाकडून हिरवा कंदीलही मिळाला. त्यानंतर मंगळवारी झालेल्या बुडाच्या बैठकीमध्ये ती सर्व 28 गावे बुडामध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत ठराव करण्यात आला. त्या ठरावाला सर्व लोकप्रतिनिधींनी अनुमोदन दिले आहे. त्यामुळे यापुढे या गावांतील बेकायदा लेआऊटना ब्रेक बसणार आहे. याचबरोबर जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतानाही आता बरेच निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी बुडा कार्यालयामध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगरविकास प्राधिकरणाच्या अखत्यारित 28 गावे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी बेंगळूर येथूनही त्याला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता ही सर्व गावे बुडाच्या अखत्यारित घेतली जाणार आहेत. त्यामुळे यापुढे लेआऊट करताना बुडाची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत अजून कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये गॅझेट होणे गरजेचे असले तरी बुडा कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा अंदाज आता व्यक्त होऊ लागला आहे.
बुडाच्या कार्यक्षेत्रातील 28 गावे
बुडाच्या कार्यक्षेत्रामध्ये होनगा, कलखांब, मुचंडी, अष्टे, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री के. एच., बाळेपुंद्री बी. के., होनीहाळ, माविनकट्टी, बसरीकट्टी, मास्तमर्डी, शिंदोळी, कोंडुसकोप्प, धामणे, येळ्ळूर, यरमाळ, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, कल्लेहोळ, सुळगा, गोजगा, मण्णूर, अंबोवाडी (जाफरवाडी), अलतगा, कडोली ही गावे घेतली जाणार आहेत. त्याबाबत संपूर्ण प्रस्ताव तयार होऊन मान्यता मिळाली असून बैठकीमध्ये अनुमोदनही झाले आहे. त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया जोराने सुरू होण्याची शक्यता आहे. मास्टर प्लॅनबाबत बेंगळूरकडे आराखडाही पाठविण्यात आला आहे. शहरालगतच्या या 28 गावांतील सर्व जमिनी बुडाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणार असल्यामुळे साऱ्यांनाच फटका बसण्याची शक्यता आहे. भूपरिवर्तन करतानाही आता समस्या निर्माण होणार आहे. एकूणच ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे साऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









