माजी अध्यक्षांसह पीडीओंवर भ्रष्टाचाराचा आरोप
खानापूर : तालुक्यातील शिरोली ग्राम पंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाला असून याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तालुका पंचायत अधिकारी विरनगौडर एगनगौडर, जिल्हा पंचायत मुख्याधिकारी हर्षल भोयर यांना देण्यात आले. हा भ्रष्टाचार माजी अध्यक्षा लक्ष्मी शिवाजी पाटील, विकास अधिकारी सुनंदा एन. यांच्या संगनमतातून करण्यात आल्याचा आरोप शिरोली पंचायत सदस्यांनी केला आहे. या निवेदनावर दहा ग्रा. पं. सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिरोली ग्राम पंचायतीच्या पहिल्या कार्यकाळाच्या अध्यक्षा लक्ष्मी शिवाजी पाटील यांच्या कार्यकिर्दीत शेवटच्या नऊ महिन्यात पंचायतीच्या विकास अधिकारी सुनंदा एन. यांनी संगणमत करून 16 लाखांच्या जवळपास आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याबाबत ऑगस्ट 17 रोजी ग्राम पंचायतीची बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. यावेळी गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. त्यावेळी तत्कालीन अध्यक्षा लक्ष्मी पाटील आणि विकास अधिकारी सुनंदा एन. यांना धारेवर धरले असता त्यांनी 30 ऑगस्टपर्यंत आम्ही केलेल्या गैरव्यवहारातील रक्कम पंचायतीच्या खात्यात जमा करू, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून विकास अधिकाऱ्यांनी तर ग्रा. पं. कडे येणेच बंद केले आहे. त्यामुळे शिरोली ग्रा. पं. सदस्यांनी या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे निवेदन दिले आहे.
ग्राम पंचायतीच्या खात्यातील अंदाजे 16 लाख रुपये विविध विकासकामांच्या खोट्या पावत्या दाखवून रक्कम हडप केली आहे. तसेच सदस्यांचे नऊ महिन्यांचे मानधनही खात्यातून काढले आहे. तसेच रोजगार हमीचे फोटो दाखवून विकासकामाचा निधी लाटला आहे. पंचायत क्षेत्रातील मोबाईल टॉवरचे भाडेही खात्यावरून काढण्यात आले आहे. तसेच प्रत्येक सदस्याच्या वॉर्डातील विकासासाठी ठेवलेला 6 लाख 48 हजारचा निधीही खोटी पावती दाखवून खर्च टाकण्यात आला आहे. असा एकूण 16 लाखाच्या आसपास गैरव्यवहार करण्यात आल्याने ग्रा. पं. अध्यक्षा निलम मादार, उपाध्यक्षा विद्या बुवाजी, सदस्या गीता मादार, मॅगी पिंटो, वंदना नाईक, सदस्य कृष्णा गुरव, सुभाष पाटील, महादेव शिवलकर, दीपक गवाळकर, सदानंद पालकर या सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून निवेदन दिले आहे. आठ दिवसांत या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई न झाल्यास लोकायुक्तांकडे पुराव्यासह दाद मागणार असल्याचे सदस्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









