उपमहापौरांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : शहरात कचरा वर्गवारी करण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला असून उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये पाच ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करून तो विविध प्रकल्पांना पाठवून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन कचरा वर्गीकरण करण्याच्या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. श्रीनगर, फुलमार्केट, रविवारपेठ या ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर दक्षिण विभागातील खासबाग आणि उद्यमबाग या ठिकाणी वर्गीकरण केंद्रे सुरू केली असून त्याचे उद्घाटन उपमहापौरांच्या हस्ते करण्यात आले. सध्या पाच ठिकाणी वर्गीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने वर्गीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करावा, असा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार आता शहरातील हा कचरा दोन प्रकारे वर्गीकरण करून जमा करण्यात येणार आहे. वर्गीकरण केलेला कचरा संबंधित प्रकल्पाला पाठवून दिला जाणार आहे. त्यामुळे कचरा अधिक प्रमाणात साचणार नाही. त्याचा विविध प्रकल्पांसाठी व उत्पादनासाठी उपयोग केला जाणार आहे, असे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांनी सांगितले.









