धावांनी विजय मिळवित लंका सुपर 4 मध्ये, मेंडिस सामनावीर, शाहिदी, नबी, रशिद खानचे प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था/ लाहोर
अतिशय रोमांचक ठरलेल्या आशिया चषक स्पर्धेतील मंगळवारच्या सामन्यात अफगाणिस्तानची सुपर फोरमध्ये पोहोचण्याची संधी थोडक्यात हुकली. या सामन्यात लंकेने त्यांचा केवळ 2 धावांनी पराभव करून बांगलादेशसह सुपर फोर फेरीत स्थान मिळविले.
लंकेने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित 50 षटकांत 8 बाद 291 धावा जमविल्या. सामनावीर कुसल मेंडिसने 84 चेंडूत 92 धावांचे योगदान दिले. दिमुथ करुणारत्ने (32), चरिथ असालंका (36), दुनिथ वेलालगे (नाबाद 33), महीश थीक्षना (28) यांनीही उपयुक्त योगदान दिले. अफगाणच्या गुलबदिन नईबने 4, रशिद खानने 2 बळी मिळविले. अफगाणला सुपर फोर फेरीकरिता पात्र ठरण्यासाठी हे आव्हान 37.1 षटकांत गाठायचे होते. त्या उद्देशाने त्यांनी प्रयत्नांची शर्थही केली. पण अखेर त्यांना 2 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. 37.4 षटकांत त्यांचा डाव 289 धावांत संपुष्टात आला. अफगाण संघाला पात्र ठरण्यासाठी 37.4 षटकांत 295 धावा जमविता आल्या असत्या तरी ते पात्र ठरले असते. मात्र याची त्यांना माहिती नव्हती, असे वाटते. याशिवाय फारुकीने शेवटचे तीन चेंडू खेळून काढल्याने रशिद खानला स्ट्राईकची संधीच मिळाली नाही.
लंकेला पुढील फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. पथुम निसांका (41) व करुणारत्ने (32) यांनी लंकेला जलद सुरुवात करून देताना 63 धावांची सलामी दिली. गुलबदिन नईबने या दोघांनाही बाद केले. तिसऱ्या क्रमांकावरील कुसल मेंडिसने शानदार अर्धशतकी ख्sाळी करीत लंकेला तीनशेच्या जवळपास मजल मारून दिली. त्याने 84 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार 3 षटकार मारले. दुर्दैवाने धावचीत झाल्याने त्याचे शतक 8 धावांनी हुकले. असालंकासमवेत त्याने 102 धावांची भागीदारी केली. अफगाणच्या स्पिनर्सनी धनंजय डिसिल्वा व कर्णधार शनाका यांना सहा चेंडूच्या फरकाने बाद केल्याने 300 चा टप्पा लंकेला गाठता आला नाही. आठव्या गड्यासाठी थीक्षना व वेलालगे यांनी 64 धावांची भागीदारी केल्याने संघाला 291 धावांपर्यंत मजल मारता आली.
अफगाणने निर्धारी खेळ करीत पात्रता मिळविण्याच्या जिद्दीने खेळ केला. 8 षटकांत 3 बाद 50 अशा स्थितीनंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. चौथ्या गड्यासाठी रहमत शहा (40 चेंडूत 45) व कर्णधार हशमतउल्लाह शाहिदी (66 चेंडूत 59) यांनी 71 धावांची भागीदारी केली. शाहिदीला नंतर मोहम्मद नबीने चांगली साथ दिली आणि दोघांनी पाचव्या गड्यासाठी 47 चेंडूत 80 धावांची वेगवान भागीदारी केली. नबीने आक्रमक फटकेबाजी करीत केवळ 32 चेंडूत 6 चौकार, 5 षटकारांसह 65 धावा झोडपल्या. हशमतउल्लाह सातव्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार, 1 षटकार मारला. अखेरच्या टप्प्यात करिम जनतने 13 चेंडूत 22, नजिबउल्लाह झद्रनने 15 चेंडूत 23, रशिद खानने 16 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 27 धावा फटकावल्या. मात्र त्यांचा डाव 37.4 षटकांत 289 धावांत आटोपला. लंकेच्या कसुन रजिथाने 79 धावांत 4, वेलालगे व धनंजय डिसिल्वाने प्रत्येकी 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक : लंका 50 षटकांत 8 बाद 291 : निसांका 41, मेंडिस 92, असालंका 36, वेलालगे नाबाद 33, थीक्षना 28, गुलबदिन नईब 4-60, रशिद खान 2-63. अफगाण 37.4 षटकांत सर्व बाद 289 : गुलबदिन 22, रहमत शहा 45, हशमतउल्लाह 59, मोहम्मद नबी 32 चेंडूत 65, जनत 22, नजिबउल्लाह झद्रन 23, रशिद खान नाबाद 27, अवांतर 15, कसुन रजिथा 4-79, वेलालगे 2-36, धनंजय डिसिल्वा 2-12.
सुपर 4 फेरीतील भारताचे सामने रविवारी 10 रोजी पाकविरुद्ध, 12 रोजी लंकेविरुद्ध, 15 रोजी बांगलादेशविरुद्ध होईल. 17 रोजी अंतिम लढत होणार आहे.
आजचा सामना (सुपर 4)
बांगलादेश वि. पाक
स्थळ : लाहोर, वेळ : दु. 3 पासून









