वृत्तसंस्था/ रियाध
जागतिक स्पर्धेत पदार्पण करताना भारतीय वेटलिफ्टर शुभम तोडकरने पुऊषांच्या 61 किलो वजनी गटातील स्पर्धेतील ‘ड’ गटात तिसरे स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या या 26 वर्षीय राष्ट्रीय विजेत्याने एकूण 269 किलो (119 किलो व 150 किलो) वजन उचलले. ते मे महिन्यातील आशियाई स्पर्धेतील त्याच्या प्रयत्नापेक्षा (263 किलो) सहा किलोग्रॅम जास्त, तर जुलैमध्ये राष्ट्रकुल खेळांत त्याला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कामगिरीपेक्षा (259 किलो) 10 किलोंनी अधिक वजनदार राहिले.
माझ्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेला नाही. परंतु एकूण उचललेले वजन पाहता मला समाधान आहे. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील माझी सर्वोच्च कामगिरी आहे, असे शुभमने त्याच्या स्पर्धेनंतर सांगितले. मलेशियाचा अझनील मोहम्मद, ज्याने 290 किलो (129 व 161 किलो) वजन उचलले आणि कोरियाचा रोक शिन, ज्याने 280 किलो (125 व 155 किलो) वजन उचलले, गटात अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले.

टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती आणि माजी विश्वविजेती मीराबाई चानू, जी या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशियाई खेळांसाठी आपली सर्व शक्ती राखून आहे, तिने अपेक्षेप्रमाणे महिलांच्या 49 किलो वजनी गटातून माघार घेतली. यंदाची जागतिक स्पर्धा ही पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या दोन अनिवार्य पात्रता स्पर्धांपैकी एक आहे.









