तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव व राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया व कोरोनाशी केल्याने सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसते. वास्तविक राजकारणी आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्ये हे मागच्या काही वर्षांतील एक समीकरणच बनले आहे. पूर्वीचे राजकारणी तोलून मोलून बोलत. आपल्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेत. विशेषत: विशिष्ट धर्मासंदर्भात बोलताना कमालीची काळजी घेतली जात असे. किंबहुना, आजच्या राजकारण्यांकडून ही आचारसंहिता पाळली जात नाही. डावे असोत वा उजवे. कुणीही याला अपवाद ठरत नाही. आपल्या विधानातून एकगठ्ठा मते कशी खेचता येतील, मतांचे ध्रुवीकरण कसे करता येईल, यावरच या मंडळींचा कटाक्ष असतो. उदयनिधी यांचे विधानही जबाबदार म्हणता येणार नाही. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपविल्याच पाहिजेत, असे ते म्हणतात. सनातन धर्मातील सगळ्याच गोष्टी योग्य आहेत, असे कुणी म्हणणार नाही. अगदी कुठल्याही धर्माबद्दलच असेच म्हणावे लागेल. सनातन धर्म नि सामाजिक न्याय वा समत्व याबाबत नक्कीच मतमतांतरे असू शकतात. प्रथा, परंपरांबाबतही आक्षेप घेतले जाऊ शकतील. तथापि, सनातन धर्म म्हणजे सर्वार्थाने जुनाट, कालबाह्या असे म्हणणे योग्य नव्हे. खरे तर योग, आयुर्वेद हीदेखील या प्राचीनतम धर्माचीच फळे आहेत. वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पनाही त्यातलीच. कालपरत्वे काही अनिष्ट गोष्टी शिरल्या. त्यातून सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाचा संकोच झाला. यात शंका नाही. परंतु, म्हणून संपूर्ण सनातन धर्म हा एखाद्या आजारासारखा असल्याची उदयनिधी यांची मांडणी एकतर्फी ठरते. कऊणानिधी यांनी हयातभर पुरोगामित्वाचा पुरस्कार केला. द्रविड चळवळ विऊद्ध सनातन धर्म हा संघर्ष तसा काही नवीन नाही. दक्षिणेत वेळोवेळी हा संघर्ष पहायला मिळाला आहे. दलितांच्या हक्कांसाठी पेरियार यांनी दिलेला लढा सर्वज्ञात आहे. अस्पृश्यता, बालविवाहापासून ते विधवा पुनर्विवाह, महिलांच्या शिक्षणापर्यंत अनेक गोष्टींना वाचा फोडत त्यांनी द्रविड चळवळीची पायाभरणी केली. कऊणानिधी यांनी हाच वारसा घेत चळवळ पुढे नेली. त्यांचे पुत्र व नातू त्याच मार्गाने जात असतील, तर तेही समजण्यासारखे आहे. मुळात द्रविड मुन्नेत्र कळगम या पक्षाच्या विचारधारेचा बेस हा पुरोगामीत्व हा आहे. त्यामुळे सनातनी विचारांबद्दल कऊणानिधी यांच्या नातवाचे काही आक्षेप असतील, तर ते जरूर नोंदवू शकतात. किंबहुना, संबंध सनातन धर्म म्हणजे वाईटच हा दृष्टीकोन बरा नव्हे. आता उदयनिधींच्या विधानांवरून भाजपाने इंडिया आघाडीलाच लक्ष्य केल्याचे पहायला मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह संघ परिवारातील मंडळींनी त्यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठविली असून, स्टॅलिन व इंडिया आघाडीने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. द्रमुक हा इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. तामिळनाडूत या पक्षाचे प्राबल्य आहे. राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रेची सुऊवात याच राज्यातून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या पुढाकारातूनच झाली होती. त्यामुळे उदयनिधी यांच्या विधानावरून भाजपाने रान उठविणे, हे ओघाने आलेच. या माध्यमातून इंडिया आघाडी ही कशी हिंदूविरोधी आहे, हे सांगण्याचा संबंधितांचा प्रयत्न असावा. ध्रुवीकरण मंत्राचा सतत जप करणे, ही या पक्षाची खासियत आहे. आता आयताच असा मुद्दा मिळत असेल, तर ते कसा सोडतील? मुळात कुणी कितीही नाही म्हटले, तरी इंडिया आघाडीने भाजपापुढे बऱ्यापैकी आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळेच मागच्या दोन निवडणुकांप्रमाणे आगामी निवडणूक एकतर्फी होईल, अशी चिन्हे नाहीत. मात्र, तशी ती व्हावी, याकरिता वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांना हवा कशी देता येईल, हा भाजपाचा प्रयत्न असेल. अलीकडे तर चुकीच्या गोष्टीही कशा बरोबर होत्या, त्यात कसे शास्त्र होते, वगैरे ठसविण्याचा प्रयत्न अत्यंत आकर्षक पद्धतीने केला जातो. गोबेल्स नीतीचाच हा दुसरा प्रकार. त्यामुळे उदयनिधी यांचे वक्तव्य काय किंवा देशातील सत्ताधारी पक्षाचे त्यावरचे राजकारण काय, यात स्वार्थाशिवाय काही नाही. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीही या वादग्रस्त वक्तव्याविषयी असहमती दर्शविली आहे. काँग्रेसने आमचा सर्वधर्मसमभावावर विश्वास असल्याचे म्हटले आहे. तर ममता बॅनर्जी यांनीही प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे, असे सुनावत उदयनिधींच्या अनुभवाबद्दलच साशंकता व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता देशातील राजकीय पक्षांनी जनतेच्या प्रश्नांवर अधिक फोकस ठेवायला हवा. महागाई, बेरोजगारी व इतर जीवन मरणाच्या प्रश्नांवर भूमिका घ्यायला हवी. त्याऐवजी धर्माभोवतीच ते फिरत असतील, तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय संस्कृती ही जगभरात श्रेष्ठ मानली जाते, ती तिच्या सर्वांना सामावून घेण्याच्या महान तत्त्वामुळेच. म्हणूनच भारतात जी विविधता दिसते, ती अन्यत्र कुठेही दिसत नाही. विविधतेतून एकता, असे आपण म्हणतो. ही एकता, ऐक्य टिकवून ठेवणे, ही तुम्हा आम्हा सर्वांबरोबरच ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून संबोधतो, त्या राजकारण्यांचीही जबाबदारी आहे. राष्ट्रीय ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले, तर त्यातून बऱ्याच गोष्टी मार्गी लागू शकतात. यंदा पावसाने ओढ दिल्याने देशातील बहुतांश भाग अवर्षणात अडकण्याची भीती आहे. अवघा देश दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला, तर त्याचे समाजजीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती ध्यानात घेऊन त्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित काम करावे. राजकीय पक्षांमधील स्पर्धा वा वाद सनातन असला, तरी त्यांनी उगाच सामाजिक वातावरण कलुषित करू नये.








