प्रतिनिधी,कोल्हापूर
मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणली.देशाचे संविधान मोडीत काढून मनुवादी निती आणण्याचा कटही मोदी सरकार रचत आहे.कामगारांसाठीचे 67 कायदे मोडीत काढून त्यांना हक्कापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्रही सरकार करत आहे. मणिपूर दंगलप्रकरणी तर सरकार ठाम भूमिका घ्यायला तयार नाही.विविधतेने नटलेल्या भारतात जाती-धर्माचे राजकारण करत तेढ माजवण्यात हे सरकार आघाडीवर नाही.वन नेशन…वन इलेक्शन हे विधेयक आणून प्रादेक्षिक व छोटे पक्ष संपण्याचा डावही सरकार खेळ आहे.अशा या जनता विरोधी सरकारला जागा दाखवावीच लागेल,अशी भूमिका घेऊन मोदी हटाव…देश बचावचा नारा प्रागतिक पक्षाच्या वतीने सोमवारी आयोजित कोल्हापूर विभागीय मेळाव्यात दिला.याचबरोबर मोदी सरकारला हटावण्यासाठी प्रागतिक पक्षाची सर्व ताकद इंडियाला देण्याचा निर्धारही मेळाव्यात केला.
महासैनिक दरबार हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील होते.मेळाव्याला कोल्हापूर,सांगली,सातारा व सिंधुदूर्ग येथील शेतकरी व तरूण वर्गासह सामान्य नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्यासमोर शाहीर रंगराव पाटील यांनी 3 पोवाडे सादर करून प्रागतिक पक्षाची भूमिका मांडली.यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात केली.मेळाव्यात विविध पक्षांमधील नेत्यांनी मोदी सरकारवर टिकेची झोड उटवली. मोदी सरकारला उलथून टाकले नाही तर देशात हुकूमशाही माजेल,अशी भीतीही व्यक्त केली.शेकापचे भारत पाटील यांनी जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यांवर झालेल्या लाठीचार्ज निषेध केला.तसेच लाठीचार्जची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,असा ठराव मांडला.तो मंजूर झाल्यानंतर मराठा आरक्षण लढ्याला प्रागतिक पक्षांचा पाठिंबा असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले.
प्रागतिक पक्ष हा तिसरी आघाडी नाही.दिनदुबळे,कामगार,शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी दोन वर्षापूर्वीच प्रागतिक पक्ष स्थापन केल्याचे सांगून शेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले,काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इंडियाने मोदी हटावबाबत घेतलेल्या भूमिकेशी प्रागतिक पक्षाची भूमिका जुळत आहे.म्हणून प्रागतिक पक्षाने इंडियाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.मोदी सरकार देशात वन नेशन-वन इलेक्शन हे विधेयक आणू पाहत आहे. त्याला जनतेचा विरोध आहे.पण विरोधाला न जुमानता दडपशाहीच्या जोरावर वन नेशन-वन इलेक्शन हे विधेयक आणून प्रादेशिक व छोटे पक्ष संपवले जातील.मोदींचा हा कट हाणून पाडण्यासाठी ग्रामपंचायतीपासून लढा उभारावा लागले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,लोकशाही धोक्यात आणलेल्या राज्य व केंद्रातील सत्ता पालटून टाकण्यासाठी प्रागतिक पक्षाची खरी गरज ठरेल.सध्या जे पक्ष व नेते मोदी सरकार विरोधात बोलत नाहीत,त्यांना ईडी, सीबीआयची भीती हे स्पष्टपणे दिसते आहे.मधल्या काळात विचारांचे बुरूज ढासळून गेले.शिवाय मोदी सरकारच्या शेतकरी,अल्पसंख्यांक व कामगारांविरोधी भूमिकेबद्दल चळवळी करून विचारणा होणे आवश्यक होते.पण त्या झाल्या नाहीत.या चळवळी न झाल्यानेच कामगारांसाठी आवश्यक असलेला किमान वेतन कायदा मंजूरीसाठी संसदेत आला नाही.मात्र भविष्यात असे घडून चालणार नाही.चळवळी झाल्या तर सरकारला लगाम बसणार नाही.शिवाय एकमेकांच्या हातात हात घालून रस्त्यावर उतरालो नाही तर देशातील जनतेचे भवितव्य धोक्यात येईल.महाराष्ट्र चळवळींना पोरका होऊन जाईल,अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले,देश स्वतंत्र होण्यापूर्वी आणि स्वातंत्र्यनंतर देशाला शेतकरी, कामगार,श्रमजीवी,कष्टकऱ्यांनी पुढे आणले आहे.मात्र त्यांचा गैरफायदा घेऊन मोदी सरकारने त्यांची लुट केली.या लुटीचा फटका प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना आजही बसत आहे.बड्या उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या जमिनी दडपशाहीने मिळवून देत सरकारने उन्माद माजवला.तो उतरवण्यासाठी प्रागतिक पक्षाच्या ऊपाने तयार झालेला विचारांचा समुद्र खवळून उटेल.
जनता दल सेक्युलरचे राज्य समन्वयक प्रताप होगाडे म्हणाले,केंद्र व राज्य सरकार जनतेच्या मुळ मुद्यांवर चर्चाच करत नाही.विकासाच्या मुद्यांवरही खुलून बोलत नाही.मात्र भावनिक,धार्मिक उन्माद दाखवत देशातील अल्पसंख्यांकाची फाळणी कशी होईल,याचा कृतीशील विचार सरकार सतत करत आहे.असे सरकार सत्तेत राहिले तर देशाची अवस्था वाईट होईल.माकपचे राज्यसचिव डॉ.उदय नारकर म्हणाले,संयुक्त महाराष्ट्राशी नाळ जुळलेली असलेल्या 13 पक्षांचा मिळवून प्रागतिक पक्ष तयार केला आहे.भाजप सरकार देशातही नको आणि राज्यातही नको अशी ठाम भूमिकाही याच प्रागतिक पक्षाची आहे.आता या पक्षाला जनतेला सोबत घेऊन लढाई करावी लागेल.
भाकपचे राजू देसले म्हणाले, नव्या पिढीला जाती-धर्माच्या तेढमध्ये गुंतवण्याचे कारस्थान सरकार करत आहे. ते मोडीत काढण्यासाठी संघर्ष करावाच लागेल आणि या संघर्षांसाठी प्रागतिक पक्ष नेहमीच सज्ज असेल. माकपचा सांगली जिल्हा सेक्रेटरी रेहाना शेख यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे करायचे काय खाली डोक वर पाय अशी गेली दहा वर्षेत दिली जात असलेली घोषणा सत्यात आणण्याची संधी आगामी निवडणूकीवेळी मिळणार आहे.ती वाया घालवू नये. यावेळी लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, श्रमिक मुक्तीदलाचे संपत देसाई, माकपचे कोल्हापूर सचिव सतीशचंद्र कांबळे, सातारा माकपचे माणिक अवघडे, भारत राष्ट्र समितीचे राज्यसचिव रामचंद्र कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. जालंदर पाटील यांची ही भाषणे झाली. मेळाव्याला शेकापचे बाबूराव कदम, चंद्रकांत यादव, राजेंद्र गड्यानवर, प्राचार्य ए. बी. पाटील, हसन देसाई, शिवाजीराव परुळेकर, राजू कोरडे व अजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शेकापचे बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. भाकप गिरीश फोंडे यांनी प्रास्ताविक केले.संभाजीराव जगदाळे यांनी सुत्रसंचलन केले. जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी आभार मानले.