वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचा सवाल : आपल्याला फसविण्यासाठी ऑडियो टेपची तयारी
पणजी : वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयातून पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी अद्याप सोशल मीडियावरील ‘त्या’ मजकुराविषयी चौकशी केली नसल्याबद्दल गुदिन्हो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आपल्याला फसविण्यासाठी काहीजणांकडून आता ऑडियो टेप तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दै. ‘तरुण भारत’शी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, आपण कोणतेही पाप केलेले नाही. जो प्रकार घडलेलाच नाही तो घडलेला आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी ट्विट केल्यानंतर लागलीच कोणीतरी आपला फोटो एका महिला उपसरपंचाबरोबर दाखवून आणि नको असलेली, खोटी रचलेली माहिती त्यात टाकण्यात आली.
सोशल मीडियावऊन ही माहिती उघड करण्यामागे नेमका कोण आहे? हे शोधून काढण्यासाठी आपल्या कार्यालयातून पोलिसांकडे लेखी तक्रार केलेली आहे. असे असताना पोलीस नेमके का चौकशी करीत नाहीत? असा सवाल गुदिन्हो यांनी उपस्थित केला आहे. एवढे कऊनही अजून काहीजण गप्प बसलेले नाहीत, तर आपल्या आवाजाची हुबेहुब नक्कल करीत एक ऑडियो टेपही लवकरच उघडकीस करण्याच्या तयारीत आहेत, या गोष्टीचा सुगावा आपल्याला लागलेला आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्ताधारी पक्षातून देखील असा प्रकार होत असण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. आपल्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढून कोणीतरी ती जागा भऊन काढण्याचा प्रयत्न करीत असेल, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.









