बसवण कुडची येथे भाविकांची अमाप गर्दी
वार्ताहर /सांबरा
बसवण कुडची येथे श्रावण मासानिमित्त श्री कलमेश्वर बसवेश्वर मंदिरात आयोजित महाप्रसादाचा सोमवारी हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी चारनंतर महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. दरवर्षी येथे श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्री कलमेश्वर बसवेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर असून एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात दर सोमवारी भाविकांची गर्दी असते. तसेच दरवर्षी हजारो भाविकांची महाप्रसादाला उपस्थिती असते. पंचक्रोशीतील तसेच शहर व तालुक्यातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महाप्रसाद घेऊन परतणाऱ्या भाविकांची अपुऱ्या बससेवेमुळे मात्र गैरसोय झाली. बेळगाव येथून येणाऱ्या बसेस भरून येत असल्याने निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, सुळेभावी आदि गावांना जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. भाविकांना बराचवेळ बसच्या प्रतीक्षेत बसथांब्यावर थांबावे लागले. मंदिर परिसरात रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद सुरू होता.
कंग्राळी बुद्रुक येथे पावसासाठी गाऱ्हाणे
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गावचे जागृत ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरमध्ये देवस्थान पंचकमिटी, मंदिर सेवा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार श्रावण मासानिमित सोमवारी आयोजित महाप्रसादाचा 25 हजारहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. तसेच मंदिरसेवा कमिटीने कलमेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी योग्य नियोजन राबविल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. श्री कलमेश्वर मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त महाप्रसाद वाटपची ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली आहे. सोमवारी महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. दुपारी कलमेश्वर देवस्थानच्या पालखीची सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली.
पावसासाठी साकडे
यावर्षी पावसाचे हवामान कोलमडले आहे. महिन्याभरापासून पाऊस पडत नसल्यामुळे पिके उन्हाने होरपळून जात आहे. सध्या पावसाची नितांत गरज आहे. तू सर्वांचा तारणकर्ता आहेस, तूच दमदार पाऊस पाडून सर्वांना दिलासा देण्याची मागणी करत श्री कलमेश्वर देवस्थानला गाऱ्हाणे घालण्यात आले.









