अन्न-नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता आहे. त्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 114 तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 10 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती अन्न-नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. दुष्काळी 114 तालुक्यांमध्ये किती रेशनकार्डधारक आहेत, यासंबंधीची माहिती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. दुष्काळी भागातील जनतेला पैशांऐवजी प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. याकरिता तयारी सुरू केली आहे. राज्यातील दुष्काळी भागात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात कोणते तालुके दुष्काळग्रस्त आहेत, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर त्वरित अशा तालुक्यांमध्ये तांदूळ वितरण करण्यात येईल. पैशांऐवजी तांदूळ देण्यात येणार आहेत. आठवडाभरात तांदूळ खरेदीचा व्यवहार अंतिम होणार आहे. याकरिता टेंडर प्रक्रिया चालविली जात आहे. आंध्रपदेश, तेलंगण, छत्तीसगड राज्ये तांदूळ पुरवठा करण्यास पुढे आली आहेत. शक्य तितक्या लवकर 10 किलो तांदूळ वितरण सुरू करण्यात येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.