पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारताने सर्वात मोठ्या लोकशाहीपासून सर्वात महान लोकशाही व्हायला हवे असे उद्गार पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधना अन्वरुल हक काकर यांनी काढले आहेत. भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा असली तरी याकरता काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे. काश्मीर प्रश्नी तोडगा निघाल्याशिवाय भारतासोबत व्यापार शक्य नाही असे काकर यांनी म्हटले आहे.
आम्हाला युद्ध नको आहे, आम्ही शांततापूर्ण पद्धतीने या मुद्द्यावर तोडगा इच्छितो. परंतु शांतता प्रस्थापित न झाल्यास हा भारत, पाकिस्तान आणि जगासाठी चिंतेचा विषय ठरणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार ठप्प आहे. कलम 370 पुन्हा लागू होत नाही तोवर दोन्ही देशांदरम्यान व्यापार होणार नसल्याची घोषणा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती.
लोकशाहीबद्दल मांडली भूमिका
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते सध्या तुरुंगात आहेत. याबद्दल काकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर इम्रान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राजकीय व्यवस्थेमुळे अडचणींना सामोरे जावे लागत असल्यास हा प्रकार पाकिस्तानच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचे काकर यांनी म्हटले आहे. 9 मे रोजी पाकिस्तानात झालेली हिंसा म्हणजे गृहयुद्धाचा प्रयत्न होता. या हिंसेच्या निशाण्यावर सैन्यप्रमुख आणि त्यांची टीम होती. सैन्य तळ आणि जवानांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे काळजीवाहू पंतप्रधान काकर यांनी म्हटले आहे.









