जन्म अन् मृत्यू कधी होणार हे माणसाच्या हातात नसते. कुणाचा जन्म कधी होणार आणि कोणाचा मृत्यू कुठल्या दिवशी होणार हे परमेश्वरच ठरवत असल्याचे मानले जाते. जन्मदिन माणूस आनंदाने साजरा करत असतो. स्वत:च्या जन्मदिनी लोक मित्र, नातेवाईकांना बोलावून आनंद व्यक्त करतात. अमेरिकेच्या ओहियो येथे राहणाऱ्या एका कुटुंबासाठी वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे. ओहियो येथे राहणारे सिएरा ब्लेयर आणि जॉश इरविन यांचा जन्मदिन एकाच तारखेला आहे. हे जोडपे दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी स्वत:चा जन्मदिन साजरा करते. परंतु आता हा दिवस त्यांच्यासाठी आणखी खास ठरला आहे. या जोडप्याची जुळी मुले देखील याच तारखेला जन्माला आली आहेत. दोघेही एक मुलगा आणि एका मुलीचे पालक झाले आहेत. या दोघांनी 18 ऑगस्ट रोजीच या जगात पाऊल ठेवले आहे. या जुळ्या मुलांनी क्लीवलँडच्या हिलक्रेस्ट हॉस्पिटलमध्ये 18 ऑगस्ट रोजी जन्म घेतला आहे.
याहून सुंदर जन्मदिनाची भेट आणखी काही असू शकत नसल्याचे 31 वर्षीय इरविन यांनी म्हटले आहे. इरविन आणि सिएरा यांची भेट 2022 मध्ये झाली होती. यानंतर दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले होते. जुळ्या मुलांचा जन्मदिन सर्वात स्मरणीय जन्मदिन ठरणार असल्याची कल्पना दोघांनीही केली नव्हती. क्लीवलँड क्लीनिक हिलक्रेस्ट हॉस्पिटलने देखील या घटनेची पुष्टी दिली आहे. रुग्णालयाने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर पालकांसोबत जुळ्या मुलांची छायाचित्रे शेअर केली आहेत. आईवडिल आणि त्यांची मुले एकाच दिवशी जन्मदिन साजरा करतील असे हॉस्पिटलने नमूद पेले आहे. तर लोकांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.