दोन इटालियन नागरिकांना अटक : एएनसी विभागाची धडक कारवाई
पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हणजूण वागातोर येथे काल रविवारी पहाटे केलेल्या धडक कारवाईत 50 लाख 25 हजार ऊपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन इटालियन नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अमलीपदार्थ विरोधी विभागाने 24 तासात केलेली ही दुसरी कारवाई आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये मायकल लॉरेन्स स्टेफेनोनी उर्फ डीजे बॉबलहेड (32) आणि नील वॉल्टर (28) हे दोघेही मूळ इटालियन नागरिक आहेत. डीजे म्हणून काम करणारे हे दोघे ड्रग्जचा व्यवसाय करीत असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.
बॉबलहेडच्या खोलीत एलएसडी
रविवारी पहाटे एएनसी पोलिसांनी मायकल लॉरेन्स स्टेफेनोनी उर्फ डीजे बॉबलहेड हा ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी नियोजनबद्ध छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या खोलीतून 50 लाख ऊपये किंमतीचे एलएसडी द्रव्य तसेच काही रोख रक्कम जप्त केली आहे. बॉबलहेड या नावाने प्रसिद्ध असलेला हा संशयित साय पार्टी सर्किटमधील एक प्रमुख आहे. तो वागतोर येथील नाईट क्लबमध्ये निवासी डीजे म्हणून काम करीत होता.
नीलकडून 50 ग्रॅम चरस जप्त
दि. 2 आणि 3 सप्टेंबर रोजी हणजूण आणि वागतोर परिसरात दोन वेगवेगळ्या नाईट क्लबमध्ये दोन शोमध्ये हे दोघेही काम करणार होते. त्यावेळी हा अमलीपदार्थ विकण्यासाठी आणला होता. नील वॉल्टर याच्याकडून पोलिसांनी 25 हजार ऊपये किंमतीचा 50 ग्रॅम चरस जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यासह हेड कॉन्स्टेबल उमेश देसाई, प्रमोद कळंगुटकर, कॉन्स्टेबल नीतेश मुळगावकर, सुमित मुतकेकर, मंदार नाईक, मकरंद घाडी, योगेश मडगावकर, साईराज नाईक आणि पीसी ड्रायव्हर अनंत राऊत यांनी ही कारवाई केली. एएनसीचे पोलीस निरीक्षक सजीत पिल्लई यांच्या देखरेखीखाली हा छापा टाकण्यात आला. या संपूर्ण छाप्याचे आणि त्याच्या कामाचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क आणि पोलीस अधीक्षक (एएनसी) बोसुएट सिल्वा यांनी पेले. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर करीत आहेत.









