नैर्त्रुत्य रेल्वेचा प्रस्ताव : हुबळी-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव-बेंगळूरसह नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव नैर्त्रुत्य रेल्वेने रेल्वेमंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बेळगाव-बेंगळूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हुबळी-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात बेळगावमधूनही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी येथील विभागीय कार्यालयातून गुरुवार दि. 31 ऑगस्ट रोजी रेल्वे मंत्रालयाला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत एक पत्र पाठविण्यात आले आहे. बेळगाव-बेंगळूर या मार्गावर प्रवासी संख्या मोठी असल्यामुळे वंदे भारत सुरू झाल्यास आठ तासांमध्ये नागरिकांना बेळगावमधून बेंगळूरला पोहोचता येईल. वेगवान प्रवासामुळे इतर कामेही करणे शक्य होणार आहे. हुबळीमधून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यानंतर बेळगावमधून का नाही? यावर अनेक टीका करण्यात आल्या.
अद्यापही विद्युतीकरण सुरूच
बेळगाव ते हुबळी दरम्यान अद्याप बऱ्याच ठिकाणी रेल्वेमार्गाचे काम पूर्णत्वाला गेलेले नाही. अद्याप काही ठिकाणी विद्युतीकरण तसेच दुपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने बेळगाव-बेंगळूर या मार्गावर अद्याप वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली नव्हती. परंतु, येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने वंदे भारतची मागणी केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक उत्तर दिल्यास बेळगावच्या प्रवाशांना लवकरच वंदे भारतचा वेगवान प्रवास करता येईल.









