दर समाधानकारक : लागवडीत वाढ : रताळी उत्पादन विक्रमी होण्याचा अंदाज
बेळगाव : पावसाळी रताळी खरेदी हंगामाला प्रारंभ झाला आहे. काही ठिकाणी रताळी काढणी केली जात आहे. एपीएमसी बाजारात पावसाळी रताळ्याची आवक सुरू झाली आहे. विशेषत: मलकापूर जातीच्या रताळ्यांना प्रति क्विंटल 2500 हजार रुपये दर आहे. त्यामुळे रताळी उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे. अलीकडे रताळी वेल लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनात देखील भर पडली आहे. उन्हाळी आणि पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात रताळी वेल लागवड होऊ लागली आहे. त्यामुळे बारा महिने रताळी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. विशेषत: रताळ्यांना समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळल्याचे दिसत आहेत. लाल मातीबरोबर काळ्या मातीत देखील रताळी वेल लागवड होत आहे.
बटाटा लागवडीत घट
तालुक्यातील कुद्रेमनी, सोनोली, बेळवट्टी, अतिवाड, तुरमुरी, बाची, बाकनूर, बिजगर्णी, कावळेवाडी, कर्ले, राकसकोप, यळेबैल, कल्लेहोळ, बेळगुंदी आदी भागात रताळी लागवड क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात विक्रमी रताळी उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याबरोबर उन्हाळी उत्पादनात देखील वाढ झाली आहे. परिणामी बटाटा लागवड क्षेत्र घटले आहे. बाहेरून आग्रा, दिल्ली, इंदूर येथून येणाऱ्या बटाट्याची आवक वाढली आहे. स्थानिक बटाटा कमी झाला आहे.
पावसाअभावी फटका
मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भात, रताळी, सोयाबीन, भुईमूग या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पिके ऐन बहरात असतानाच पाऊस गेल्याने वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे यंदा फटका बसण्याची चिंता सतावत आहे.









