सुरू असलेली विकासकामे तातडीने बंद करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन
खानापूर : येथील माउलीनगर स्टेशन माळ विकास संघांच्यावतीने शनिवारी नगरपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. स्टेशन रोडवरील शाहू नगरातील माउली माळ येथे सुरू असलेली विकासकामे तातडीने बंद करण्यात यावीत, या मागणीसाठी नगरपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. नगरपंचायतीचे प्रशासक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सोमवारी नगरपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. याबाबत माहिती अशी की, येथील सोमण सिरॅमिक कारखान्यातील 138 निवृत्त कर्मचाऱ्यांना सोमण सिरॅमिक कारखान्याच्या वतीने भूखंड देण्यात आले आहेत. एकूण साडेसहा एकर जमिनीत प्लॉट पाडून हे भूखंड देण्यात आलेले आहेत.
मात्र येथील डोंबारी समाजाने या भूखंड वाटपास विरोध करत या ठिकाणी या भूखंडधारकांना येण्यास मज्जाव करत आहेत. या विरोधात माउलीनगर स्टेशन माळ विकास संघाच्यावतीने खानापूर वरिष्ठ न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून याबाबत सुनावणी सुरू आहे. असे असताना नगरपंचायतीने स्लम बोर्डाच्या माध्यमातून या ठिकाणी विकासकामांना सुऊवात केली आहे. या विरोधात माउलीनगर संघाने शनिवारी मोर्चा काढून तातडीने काम थांबवावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयात दावा सुरू असताना आमदार विठ्ठल हलगेकर आणि भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक विकास कामाचे भूमिपूजन केले आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले असून आम्ही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे माउलीनगर विकास संघाचे अध्यक्ष यल्लारी गावडे यांनी सांगितले. नगरपंचायतीने आमच्या भूखंडाचे उतारे दिले असून आमच्याकडून या भूखंडांचा फाळाही घेण्यात येतो. असे असताना पाच वर्षापासून नगरपंचायतीकडून आम्हाला बांधकामास परवानगी मिळत नसल्याने आम्ही वेळोवेळी नगरपंचायतीकडे अर्जविनंती केली. मात्र दरवेळेला टोलवाटोलवी करण्यात येते. यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे, असे यल्लारी गावडे यांनी सांगितले. याबाबत संपूर्ण माहिती घेण्यासाठी नगरपंचायतीचे प्रशासक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सोमवारी अधिकारी आणि माउलीनगर स्टेशन माळमधील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.









